बोरामणी जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपाकडून ‘नेताजीभाऊ’ खंडागळे उतरतील आखाड्यात?
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत बोरामणी मतदारसंघातून भाजपाचे युवा नेते नेताजी खंडागळे उर्फ नेताजीभाऊ मजबूत दावेदार म्हणून पुढे येत आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे. लोकसभा, विधानसभा आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांत उळे-कासेगाव परिसरातून भाजपाला मोठे मताधिक्य मिळवून देण्यात खंडागळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
नेताजी खंडागळे यांच्या संघटन कौशल्य, शांत स्वभाव, अभ्यासू वृत्ती, उत्तम वक्तृत्व आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने काम करण्याच्या तयारीमुळे त्यांची दावेदारी अधिक बळकट होत असल्याचे भाजपातील पदाधिकारी सांगतात. विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मतदारसंघात राबविलेल्या विविध कामांमध्येही खंडागळे यांनी सक्रिय सहभाग घेतला,ज्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढली आहे.
२००९ पूर्वी हा गट दक्षिण सोलापूर मतदारसंघात होता. नंतर तो अक्कलकोट मतदारसंघात गेला. या दोनही मतदारसंघांवर काँग्रेसचे वर्चस्व होते. मात्र २०१९ नंतर आ. कल्याणशेट्टी यांनी दोन वेळा विजय मिळवून भाजपाला बळ दिले. राज्य व केंद्रात सत्ता असल्याने त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी आणून विकासकामांना गती दिली.नेताजी खंडागळे यांनी २००७ साली स्थापन केलेल्या सह्याद्री फाऊंडेशनच्या माध्यमातून उळे–कासेगाव परिसरात शिक्षण, आरोग्य, पाणी, रस्ते, दिवाबत्ती समस्या सोडवण्यासाठी अनेक उपक्रम राबविले.
* गरीब मुलांना शैक्षणिक साहित्य
* शेतकरी आणि कामगारांच्या अडचणी सोडविणे
* रक्तदान शिबिरे
* नेत्र तपासणी व आरोग्य शिबिरे
* मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया
या कार्यामुळे त्यांच्या पॅनलला उळे ग्रामपंचायतीत बहुमत मिळाले आणि भाजपाचा भगवा फडकला.
२०२२ पासून खंडागळे यांनी बोरामणी मतदारसंघातही विकासकामांना वेग दिला. यामुळे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये त्यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.त्यांचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, पालकमंत्री जयभाऊ गोरे, आ. सुभाष देशमुख, आ. देवेंद्र कोठे, आ. विजयकुमार देशमुख, माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार आणि जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांच्याशी घनिष्ठ संबंध निर्माण झाले असून या नेटवर्कचा फायदा निवडणुकीत होऊ शकतो.
नेताजीभाऊ यांचा दावा, “सिंचन, रस्ते, वीज व इतर स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करीन. आमदार कल्याणशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली विकासकामे अधिक वेगाने पुढे नेऊ.”
चौकट
“पक्षश्रेष्ठींनी संधी दिली तर सोनं करून दाखविन” - नेताजी खंडागळे
“मतदारसंघातील उळे, कासेगाव, पिंजारवाडी, मुस्ती, तांदुळवाडी, बोरामणी, संगदरी, दोड्डी, मुळेगाव, बक्षी हिप्परगे, वडजी, वरळेगाव, गंगेवाडी, उळेवाडी आदी सर्व गावांना मी ३–४ वेळा भेटी देऊन जनतेच्या समस्या समजून घेतल्या आहेत. शक्य त्या सर्व मदतीचा प्रयत्न केला आहे. पक्षाने उमेदवारी दिल्यास ही संधी सोन्यासारखी करून दाखवीन.”
– नेताजी खंडागळे, उपसरपंच उळे व भाजप युवा नेते.
0 Comments