पंढरपुरात मंडळ अधिकाऱ्यास लाच घेताना रंगेहात पकडले
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शेतजमिनीचे बिनशेतीकरण करण्यासाठी आवश्यक असलेला भूसंपादन नसल्याचा अहवाल तहसील कार्यालयास पाठविण्याच्या मोबदल्यात २० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी पंढरपूर तालुक्यातील खर्डी मंडळाचे मंडळ अधिकारी दिलीप दिगंबर सरवदे (वय ५६) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. या प्रकरणात तुकाराम आसबे (वय ४५, रा. तावशी) या खासगी एजंटचीही भूमिका उघडकीस आली असून त्याच्याविरुद्धही गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
तक्रारदार यांनी प्रांत कार्यालय, पंढरपूर येथे शेतजमिनीचे बिनशेती करण्यासाठी अर्ज सादर केला होता. या अर्जाची चौकशी करून भूसंपादन नसल्याचा अहवाल तहसील कार्यालयास पाठविण्यासाठी आरोपी मंडळ अधिकारी सरवदे यांनी सुरुवातीला ५ हजार रुपये स्वीकारल्याचे मान्य केले होते. त्यानंतर उर्वरित २० हजार रुपयांची मागणी करण्यात आली.
या तक्रारीची दि. १९ नोव्हेंबर २०२५ रोजी पडताळणी करण्यात आली असता, खासगी इसम तुकाराम आसबे याने मंडळ अधिकारी सरवदे यांच्यासाठीच लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर दि. ८ डिसेंबर २०२५ रोजी रचलेल्या सापळ्यात आरोपी सरवदे यांनी स्वतः २० हजार रुपयांची लाच स्वीकारली आणि त्याच वेळी एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात अटक केली.
या कारवाईनंतर पंढरपूर शहर पोलीस ठाणे (सोलापूर ग्रामीण) येथे आरोपीविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ (सुधारित) कलम ७ व ७अ अन्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
संपूर्ण मोहिम शिरीष सरदेशपांडे (पोलीस उपायुक्त / अधीक्षक, एसीबी पुणे) व अजित पाटील (अपर पोलीस अधीक्षक) यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले,
पोलीस निरीक्षक रविंद्र लांभाते व पोलीस नाईक संतोष नरोटे, पोकों गजानन किलगी, चापोह राहूल गायकवाड या टीमने यशस्वी कारवाई केली.
एसीबी सोलापूर कार्यालय नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असून टोल फ्री क्रमांक १०६४, तसेच ऑनलाईन तक्रार पोर्टल व मोबाइल अॅपद्वारे तक्रार नोंदविण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
कोट---
“कोणताही शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने काम करणारा खासगी एजंट जर कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाच मागत असेल, तर नागरिकांनी अजिबात भीती न बाळगता तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा. अशा तक्रारी गोपनीय ठेवल्या जातील व कठोर कारवाई केली जाईल,”
— प्रशांत चौगुले, पोलीस उपअधीक्षक, एसीबी सोलापूर
0 Comments