एमआयटी गुरुकुलमध्ये दयाळूपणा दिन उत्साहात साजरा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- केगाव येथील एमआयटी विश्वशांती गुरुकुल स्कूलमध्ये शुक्रवार, दि. ५ डिसेंबर रोजी दयाळूपणा दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये सहानुभूती, करुणा आणि सामाजिक जाणीव वाढवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाची सुरुवात ‘हमको मन की शक्ति देना’ या प्रार्थनेने झाली. या प्रसंगी मुख्याध्यापिका रेखा पाटील यांनी दयाळूपणा हा सुसंवादी समाज निर्मितीचा पाया असून मानसिक आरोग्य बळकट करण्यासही तो साहाय्यभूत ठरतो, असे सांगितले.
विद्यार्थ्यांनी नृत्य, गाणी आणि सांस्कृतिक सादरीकरणांद्वारे करुणा, एकता आणि मानवी मूल्यांचा संदेश दिला. दयाळूपणा दिनानिमित्त राबवलेल्या सामाजिक उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी फळे, सुकामेवा व आवश्यक साहित्य संकलित करून जवळच्या अनाथाश्रमाला भेट दिली.‘दयाळूपण हा मानवी जीवनाचा खरा आनंद आहे’ या संदेशाने कार्यक्रमाची सांगता झाली. या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक संवेदनशीलता आणि करुणा अधिक दृढ झाल्याचे स्पष्ट झाले.
0 Comments