ब्रिज पाडण्यापूर्वीच ५४ मीटरचा रस्ता सुरू करण्याचे आयुक्तांचे आदेश
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आवंतीनगर परिसरात तयार होत असलेल्या ५४ मीटर रुंदीच्या रस्त्याची कामे वेळेत पूर्ण करून रेल्वेचा १०३ वर्षे जुना ब्रिज पाडण्यापूर्वीच हा रस्ता वाहतुकीसाठी सुरू करावा, असे आदेश महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी आज प्रत्यक्ष पाहणीत दिले.आयुक्तांनी रस्त्याच्या कामाचा वेग, मुरूम टाकणे, डांबरीकरणाची गती व गुणवत्तेची पाहणी केली. कामात कोणताही विलंब होऊ नये, तसेच सुरक्षा निकष पाळून कामे तातडीने पूर्ण करावीत, असेही त्यांनी कंत्राटदारांना बजावले.
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे चौक ते दमाणी नगरदरम्यानचा १०३ वर्ष जुन्या ब्रिजचा पाडाव लवकरच होणार आहे. नागरिकांना पर्यायी मार्ग उपलब्ध व्हावा म्हणून आवंतीनगर भागात या नव्या रस्त्याचे काम वेगाने सुरू आहे. शहरातील वाढत्या वाहतूक ताणावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे.पाहणीदरम्यान नगर अभियंता सारिका आकूलवार, नियंत्रण अधिकारी तपन डंके, लेखापरीक्षक राहुल कुलकर्णी, प्रकाश सावंत, विभागीय अधिकारी सरकाझी, सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार, सह. अभियंता प्रकाश दिवाणजी, सागर करोसेकर आदी उपस्थित होते.
यानंतर आयुक्तांनी विष्णू चाळ येथील सार्वजनिक शौचालयाची पाहणी करत स्वच्छता, पाणीपुरवठा आणि सुविधा याबाबत सुधारणा आवश्यक असल्याचे निदर्शनास आणून तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. दहिटणे गाव येथील नव्याने पूर्ण झालेले शौचालयही पाहण्यात आले.
दरम्यान, पर्यायी मार्ग म्हणून निश्चित केलेल्या डोणगाव रोडची ही त्यांनी पाहणी केली. काही ठिकाणी सुरू असलेली रस्त्याची कामे लवकर पूर्ण करण्याचे तसेच जिथे दुरुस्ती आवश्यक आहे तिथे तातडीने कामे हाती घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. पर्यायी मार्गांवरील लाईट पोल शिफ्ट करणे आणि अतिक्रमण हटवण्याबाबतही स्पष्ट सूचना देण्यात आल्या.
0 Comments