पन्नास हजार शिक्षक मतदार नोंदविल्याचा प्रा. रोंगे यांचा दावा
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- पुणे विभागातील शिक्षक मतदार नोंदणी उपक्रमात डॉ. बी. पी. रोंगे (संस्थापक, श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूर) यांनी पुढाकार घेत आतापर्यंत तब्बल ५० हजार शिक्षक मतदारांची नोंदणी करण्यात आल्याचा दावा केला आहे.
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांमध्ये सुरु असलेल्या शिक्षक मतदार नोंदणी मोहिमेला वेग देण्यासाठी डॉ. रोंगे यांनी शाळा, महाविद्यालये, तांत्रिक शिक्षा संस्था, डी.एड./बी.एड. कॉलेजेस, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांना प्रत्यक्ष भेटी दिल्या. त्यांनी शिक्षक व निवृत्त शिक्षकांशी संवाद साधत नोंदणीची गरज, नियम, आवश्यक कागदपत्रे आणि वेळापत्रक याची सविस्तर माहिती दिली. त्यांच्या या उपक्रमामुळे शिक्षकांमध्ये जागरूकता मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आले.
मतदारसंघातील नोंदणी वाढीचे जिल्हानिहाय आकडे पुढीलप्रमाणे –
पुणे जिल्हा :- 13,735
सोलापूर जिल्हा :- 11,337
सांगली जिल्हा :- 7,055
कोल्हापूर जिल्हा :- 9,798
सातारा जिल्हा :- 7,281
एकूण 49,206 शिक्षक मतदारांची नोंदणी वाढली असून, प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सुमारे 50 हजार नोंदणीस डॉ. रोंगे यांचा हातभार लागल्याचे सांगण्यात येत आहे.या वाढलेल्या नोंदणीमुळे आगामी काळात प्रा.रोंगे यांची दावेदारी अधिक बळकट होणार, अशी चर्चाही सुरू झाली आहे.
0 Comments