Hot Posts

6/recent/ticker-posts

मोहिते-पाटलांच्या विजयाची की भाजपच्या पराभवाची हॅट्रिक होणार?

 मोहिते-पाटलांच्या विजयाची की भाजपच्या पराभवाची हॅट्रिक होणार?

अकलूज(कटूसत्य वृत्त):-  अकलूज नगरपरिषदेची निवडणूक तशी एका शहरापुरती मर्यादित वाटत असली तरी निकालानंतर याचे मोठे परिणाम जाणवणार असून यावर अनेकांचे भवितव्य अवलंबून आहे. ही निवडणूक जिंकून मोहिते-पाटील भाजप विरोधातील तिसरा सलग विजय नोंदवत हैट्रिक करणार? की राम सातपुते बाजी मारून आपल्या पदरात विधानपरिषदेची आमदारकी पाडून घेणार? याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.


या निवडणुकीवर अनेकांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे. भाजपसारख्या मोठ्या आणि कडव्या पक्षाला नाराज करून मोहिते-पाटलांनी लोकसभेचा कठीण जुगार खेळला होता. पण नशीब बलवत्तर म्हणून धैर्यशील मोहिते-पाटील जिंकले आणि खासदार झाले. त्यानंतर मोहिते-पाटील यांनी अनपेक्षित अशी खेळी करून अगदी ठरवून आणि सांगून माळशिरस विधानसभेला राम सातपुते यांचा पराभव केला. यासाठी त्यांनी आपल्या उत्तमराव जानकर यांच्यासारख्या पारंपरिक कट्टर शत्रूंबरोबर हातमिळवणीही केली. यातही ते यशस्वी झाले.


आता अकलूज नगरपरिषदेची निवडणूक झाली आहे. यात मोहिते-पाटील जिंकले तर ते यशाची हॅट्रिक साजरी करतील तर रामभाऊ सातपुते यांच्या नावावर पराभवाची हॅट्रिक नोंदवली जाईल. यामुळे मोहिते- पाटलांचे राजकीय वजन आणखी वाढेल. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाबरोबरच भारतीय जनता पक्षालाही त्यांच्या ताकदीला मानावे लागेल. भाजपचे विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या आमदारकीचा कालावधी येत्या एप्रिल महिन्यात संपेल. अकलूज नगरपरिषद निवडणूक मोहिते-पाटील यांनी तुतारी चिन्हावर लढली असली तरी येथे मिळालेले यश रणजितसिंह मोहिते-पाटील यांना भविष्यात मोठे पद मिळवून देऊ शकते.


जर राम सातपुते अकलूज नगरपरिषद जिंकण्यात यशस्वी झाले तर भाजप सातपुतेंना आणखी ताकद देण्यासाठी विधानपरिषदेसाठी घेऊ शकते. बहुतेक भविष्यातील याच आमदारकीवर डोळा ठेवून सातपुते यांनी अकलूज नगरपरिषद अगदी जीव तोडून झुंजवली असावी, अशी चर्चा आहे. अकलूज नगरपरिषद जिंकली तर येणारी पंचायत समितीची निवडणूकही सोपी जाणार हे उघड गणित आहे. लवकरच माळशिरस तालुका पंचायत समितीची निवडणूक लागेल. अकलूज नगर परिषदेच्या निकालाचा या पंचायत समितीच्या निवडणुकीवर प्रभाव राहणार हे नक्की. नगरपरिषद निवडणुकीची

मतमोजणी जर ३ डिसेंबर रोजी झाली असती तर पंचायत समितीची व्यूहरचना आखायला लगेच सुरुवात झाली असती. आता लांबलेल्या निकालामुळे अनेकांची पंचायत झाली आहे. पंचायत समिती ताब्यात असणे म्हणजे तालुका ताब्यात असण्यासारखे आहे. पंचायत समितीवरील सत्ता भविष्यातील आमदारकीचा पाया असतो. माळशिरस तालुक्यात पाय घट्ट रोवायचे असतील तर तालुक्यातील ग्रामपंचायती, नगरपरिषद किंवा पंचायत समिती ताब्यात असायला हव्या आहेत. यासाठीच सातपुते प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे. सातपुते यांचा तालुक्यातील स्थानिक स्वराज संस्थांमध्ये शिरकाव होऊ नये, यासाठी मोहिते-पाटील आटोकाट प्रयत्न करत आहेत. मोहिते- पाटील आपल्या सहकारी संस्था, शिक्षण संस्था, पतसंस्था यांच्या जोरावर माळशिरस तालुक्यावर आपला प्रभाव ठेवून आहेत. याच संस्थाच्या कारभारावर हल्ला करत सातपुते मोहिते-पाटलांचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. मोहिते-पाटलांची खरी ताकत कशात आहे याचा सातपुतेंनी चांगलाच अभ्यास केलेला दिसतोय.


अकलूज नगरपरिषद, महालुंग, माळशिरस आणि नातेपुते नगरपंचायत झाल्यामुळे माळशिरस तालुक्याच्या गट आणि गण संख्येत व रचनेत फरक पडला आहे. पूर्वी तालुक्यात जिल्हा परिषदेचे ११ गट आणि पंचायत समितीचे २२ गण होते तर आता ९ गट आणि १८ गण आहेत.

Reactions

Post a Comment

0 Comments