Hot Posts

6/recent/ticker-posts

पालकमंत्री गोरेंच्या 'मिशन लोटस'ला फटका

 पालकमंत्री गोरेंच्या 'मिशन लोटस'ला फटका



--

--अति आत्मविश्वास, स्थानिक नेत्यांतील विसंवाद आणि विरोधकांच्या रणनीतीमुळे भाजपचा पराभव
- सत्तेतील मित्र पक्षांनी मारली विजयाची बाजी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होताच जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. अकलूज नगरपालिकेच्या निवडणुकीत माजी आमदार राम सातपुते यांना या निवडणुकीत मोठा धक्का बसला असून, माढा लोकसभा मतदारसंघातील तब्बल पाच नगरपालिकांमध्ये भाजपचा पराभव झाला आहे.
दरम्यान, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या 'मिशन लोटस'लाही या निवडणुकीत मोठा फटका बसला आहे. भाजपने जिल्ह्यात मोठ्या अपेक्षेने निवडणूक लढवली होती. मात्र, अति आत्मविश्वास, स्थानिक नेत्यांतील विसंवाद आणि विरोधकांची मजबूत रणनीती यामुळे भाजपला पराभव स्वीकारावा लागला. एकूणच, सोलापूर जिल्ह्यातील या नगरपालिकांच्या निकालांनी जिल्ह्याच्या राजकारणात नवा संदेश दिला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील नगरपरिषद, नगरपंचायातच्या सार्वत्रिक निवडणूकीचा मतांचा कौल समोर आला आहे. सत्तेतील विभक्त स्वतंत्रपणे लढणारे राज्य आणि केंद्रात युती असणाऱ्या भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाने विजयाची बाजी मारली आहे. भाजपा ४, शिवसेना शिंदे गट ३, स्थानिक आघाड्या ३, शरद पवारांची राष्ट्रवादी १, शिवसेना उबाठा १ जागेवर नगरपरिषदेच्या चुरशीच्या लढतीत पक्षांना यश प्राप्त झाले आहे.
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेल्या तीन नगरपरिषदेच्या निवडणूकीत अकलकोट आणि मैंदर्गी नगरपरिषद मध्ये घवघवीत यश मिळाले आहे. तर मंगळवेढा पंढरपूरचे भाजपा आमदार समाधान आवताडे यांच्या हातातून मंगळवेढा आणि पंढरपूर नगरपरिषद निसटल्या आहेत. आवताडे यांचे नातेवाईक सुनंदा आवताडे मंगळवेढा तर पंढरपूर स्व. आमदार भारत भालके यांच्या सुन डॉ. प्रणिता भालके या स्थानिक आघाडीतुन विजयी झाल्या आहेत. यासह भाजपाने बार्शी नगरपरिषदेत माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली विजय मिळविला आहे. तर अनगर नगरपंचायत माजी आमदार राजन पाटील यांनी बिनविरोध केली आहे. राजन पाटील यांनी गेल्या महीन्यात भाजपा पक्षात प्रवेश केला आहे. जिल्ह्यात १२ पैकी भाजपाला ३ नगर परिषद आणि १ नगरपंचायात खेचण्यात यश प्राप्त झाले आहे.
शिवसेना शिंदे गटाने जोरदार मुसंडी मारली आहे . माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली शिंदेसेनेचे नगराध्यक्षांसह २२ उमेदवार विजयी झाले आहेत. यासह सांगोल्यात माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी शिंदेसेनेचा झेंडा नगरपरिषेदेवर फडकविला आहे. मोहोळमध्ये प्रथमचं शिंदेसेनेचा नगराध्यक्ष निवडून आला आहे. कुर्डुवाडी नगरपरिषदेत शिवसेना उबाठा गटाने आपले स्थान आबाधीत ठेवले आहे.
करमाळा नगरपरिषदेवर स्थानिक आघाडीचा प्रभाव दिसून आला. सावंत गटाने वर्चस्व स्थापन केले आहे. जिल्ह्याचे लक्ष लागून राहीलेल्या अकलूज नगरपरिषद सर्वाधीक चर्चेत राहीली. खासदार धैर्यशील मोहीते पाटील यांच्या नेतृत्वाखाली शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यात आली. या निवडणूकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने यश संपादन केले. अजित पवार गट आणि भाजपाने उभा केलेल्या नगरध्यक्षपदाचा उमेदवार यांचा दारूण पराभव झाला आहे.
चौकट -
सोलापूर नगरपरिषद निवडणूक निकाल नगराध्यक्ष
अक्कलकोट – मिलन कल्याणशेट्टी (भाजपा)
मैंदर्गी – अंजली बाजारमठ  (भाजपा)
बार्शी –  तेजस्विनी कथले (भाजप)
अनगर – प्राजक्ता पाटील (भाजपा)
दुधनी – प्रथमेश म्हेत्रे  (शिवसेना शिंदे गट)
सांगोला – आनंदा माने  (शिवसेना शिंदे गट)
मोहोळ –  सिद्धी वस्त्रे  (शिवसेना शिंदे गट)
कुर्डूवाडी – जयश्री भिसे (शिवसेना ठाकरे गट)
मंगळवेढा – सुनंदा अवताडे  (तीर्थक्षेत्र विकास आघाडी)
अकलूज – रेशमा अडगळे  (शरदचंद्र पवार राष्ट्रवादी)
करमाळा – मोहिनी सावंत (स्थानिक विकास आघाडी)
पंढरपूर – डॉ. प्रणिता भालके (तीर्थक्षेत्र विकास आघाडी)
चौकट -
पक्षीय बलाबल
भाजपा – ०४
शिवसेना एकनाथ शिंदे गट – ०३
तीर्थक्षेत्र विकास आघाडी- ०२
शिवसेना उद्धव ठाकरे गट- ०१
राष्ट्रवादी शरद पवार गट – ०१
स्थानिक विकास आघाडी – ०१
एकूण  = १२

Reactions

Post a Comment

0 Comments