घनकचरा अधिकारी व सेवकांसाठी 'क्षमता बांधणी' कार्यशाळेचे आयोजन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहराला स्वच्छ सर्वेक्षण २०२५ मध्ये उत्कृष्ट स्थान मिळवून देण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने घनकचरा व्यवस्थापन (Solid Waste Management - SWM) अंतर्गत 'क्षमता बांधणी' कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यशवंतराव चव्हाण सभागृह, कौन्सिल हॉल येथे ८ डिसेंबर ते १६ डिसेंबर या कालावधीत ही महत्त्वपूर्ण कार्यशाळा सुरू आहे.
सोमपा आयुक्त डॉ. सचिन ओम्बेसे यांच्या सूचनेनुसार आणि अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यशाळेत सफाई कर्मचारी, घंटागाडी ड्रायव्हर, तसेच मुख्य आरोग्य निरीक्षक अशा सर्व स्तरावरील कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग आहे.
यावेळी मार्गदर्शन करताना अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी सर्व सफाई कर्मचाऱ्यांच्या कार्याचे मुक्तकंठाने कौतुक केले. त्या म्हणाल्या, "ज्याप्रमाणे सीमेवरील सैनिकांबद्दल देशाला अभिमान आहे, त्याचप्रमाणे कोणताही सण असो वा उत्सव, शहराच्या स्वच्छतेसाठी अविरत झटणाऱ्या आपल्या सर्व कर्मचाऱ्यांबद्दल आम्हाला अभिमान आहे. तुमच्या या निस्वार्थ कार्यामुळेच शहरातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते. तुमचे कौतुक जितके करावे तितके कमीच आहे."
यासोबतच त्यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यावर विशेष भर दिला. कर्मचाऱ्यांनी महापालिकेद्वारे दिलेली सुरक्षा उपकरणे नियमित वापरावीत, जेणेकरून त्यांचे आरोग्य उत्तम राहील व आजारपणापासून बचाव होईल, असे आवाहन त्यांनी केले.
तसेच, पवार यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली की, ज्या कर्मचाऱ्यांचे शिक्षण चांगले झाले आहे व ज्यांच्याकडे गुणवत्ता व पात्रता आहे, अशा सेवकांना त्यांच्या शिक्षणानुसार व कार्यानुसार पदोन्नती देण्याचे कार्य महानगरपालिका लवकरच हाती घेणार आहे.
या कार्यक्रमादरम्यान, विभागीय कार्यालय क्रमांक पाचमध्ये उत्तम कार्य करणाऱ्या सेवकांचा अतिरिक्त आयुक्त यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. सन्मानित सेवकांमध्ये विठाबाई सुधाकर कांबळे (झाडूवाली), सुमन सुभाष साबळे (झाडूवाली), कृष्णा वेंकटेश बोणसे (सफाई कामगार), राजू बीसना सांगे (सफाई कामगार), अविनाश सुभाष सरवदे (बिगारी) आणि नामदेव निवृत्ती वाघमारे (बिगारी) यांचा समावेश होता.
यावेळी शहर समन्वयक तेजस शहा, मुख्य आरोग्य निरीक्षक सूर्यकांत लोखंडे, झोन ५ चे सर्व आरोग्य निरीक्षक व सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.png)
0 Comments