टेंभुर्णीत क्रांतिकारी संघर्ष सेनेचा निषेध मोर्चा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, December 13, 2025

टेंभुर्णीत क्रांतिकारी संघर्ष सेनेचा निषेध मोर्चा

 टेंभुर्णीत क्रांतिकारी संघर्ष सेनेचा निषेध मोर्चा



टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- कंदर (ता. करमाळा) येथील युवक राहुल चव्हाण यांच्यावर वाळू वाहतुकीसंबंधी माहिती (टीपा) पोलिसांना देत असल्याच्या संशयावरून ४ डिसेंबर रोजी टेंभुर्णी–करमाळा रोडवरील टोलनाक्याजवळ हल्ला झाल्याच्या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी करत क्रांतिकारी संघर्ष सेनेने गुरुवारी टेंभुर्णी पोलीस ठाण्यासमोर भव्य निषेध मोर्चा काढला. या घटनेत चव्हाण यांनी अकोले-खुर्द परिसरातील काही व्यक्तींविरोधात तक्रार दिली असून तपास दोन्ही बाजूंच्या तक्रारींवर सुरू आहे.

मोर्चाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शांततेत करण्यात आली. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वाढलेल्या असंतोषामुळे मोठ्या संख्येने बहुजन समाज, युवक व महिला मोर्चात सहभागी झाल्या. चव्हाण यांच्यावर झालेल्या हल्ल्यातील परिस्थिती, वाळू वाहतुकीशी संबंधित मतभेद आणि संशयाच्या कारणावरून निर्माण झालेल्या वादाच्या तपासात गती देण्यात यावी, तसेच या घटनेशी जोडल्या गेलेल्या अवैध वाळू उपसा व वाहतुकीच्या संपूर्ण साखळीची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मोर्चात करण्यात आली.

मोर्चाचे नेतृत्व करताना क्रांतिकारी संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश भोसले यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात नमूद केले की, हल्ला ही केवळ व्यक्तीगत भांडणाची बाब नसून त्यामागे चालणाऱ्या अवैध वाळू व्यवसायातील व्यवहार, वाहनांचा वापर आणि आर्थिक देवाणघेवाणीची तपासणी अत्यंत आवश्यक आहे. संबंधित पुरावे तपास यंत्रणेला सुपूर्द करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. “अत्याचाराच्या कोणत्याही प्रकरणात न्याय्य, निष्पक्ष आणि तातडीचा तपास होणे आवश्यक आहे. आरोपी कोणत्याही गटाचे असले तरी कायद्यात सर्व समान आहेत,” असे भोसले म्हणाले.

मोर्चादरम्यान कोणताही कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. हा निषेध कोणत्याही व्यक्तिविरुद्ध नसून अन्याय करणाऱ्या प्रवृत्तीविरोधात असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. मोर्चात आलेल्या शेकडो नागरिकांसमोर टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पवार यांनी स्वतः उपस्थित राहून निवेदन स्वीकारले आणि तपासातील सर्व बाबींची काटेकोर चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.

मोर्चात पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष दीपक साठे, राज्य उपाध्यक्ष विजयकुमार कदम, निलेश खरात, आकाश खंडाळे, चंद्रकांत खंडागळे, अक्षय गायकवाड, दीपक लावंड, किरण तूपसुंदर, रमेश कुचेकर, राहुल भोसले, आनंद दळवी, पोपट दळवी, अंकुश चव्हाण, गणेश आव्हाड, लहू चव्हाण, गणेश खंडाळे, शंभू कुचेकर यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages