शनिवारी दत्तामामा भरणे तर रविवारी अण्णा बनसोडे सोलापूरात
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जवळपास ४६५ इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे अजितदादा पवार यांच्या पक्षाकडे सर्व धर्मीय इच्छुकांची क्रेज पाहता महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेचा भागीदारी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सोलापुरातील या राजकीय घडामोडीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जातीने लक्ष घातले आहे.सोलापूर राष्ट्रवादीमधील राजकीय परिस्थिती व घडामोडी तसेच इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती व अन्य बाबींसंदर्भातील आढावा शुक्रवारी सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान आणि प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी पुण्यात पक्षाचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांच्यासोबत झालेल्या पहिल्या बैठकीत मांडला. त्यानंतर विचार विनिमय होऊन पुण्यातील बारामती होस्टेल येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या समवेत सहसंपर्कमंत्री अण्णा बनसोडे, शहर - जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान आणि प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांची अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
सोलापूर शहरातील सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ताकद देण्यासाठी खुद्द अजितदादा पवार यांनीच लक्ष घातले. अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादीचे संपर्कमंत्री दत्तात्रय भरणे व सहसंपर्कमंत्री अण्णा बनसोडे यांना तातडीने सोलापूर येथे जाऊन इच्छुक उमेदवार तसेच पदाधिकारी यांच्याशी संवाद साधण्याच्या सूचना दिल्या आहे. अजितदादा पवार यांच्या सूचनेनुसार उद्या शनिवार २७ डिसेंबर रोजी संपर्कमंत्री दत्तात्रय भरणे दुपारी १२ वाजता राष्ट्रवादी भवनात बैठक घेणार आहेत तसेच दुपारी 4 वाजता प्रभाग 4 व 5 येथे आनंद चंदनशिवे यांच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे याच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे तर रविवार २८ डिसेंबर रोजी सहसंपर्कमंत्री अण्णा बनसोडे सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक घेणार आहेत, अशी माहिती शहर- जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान आणि प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी दिली. यावेळी राष्ट्रवादीचे जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले उपस्थित होते.

0 Comments