Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गट घड्याळ चिन्हावरच लढवणार- उमेश पाटील

 सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गट घड्याळ चिन्हावरच लढवणार- उमेश पाटील




मोहोळ (कटूसत्य वृत्त):- आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सोलापूर जिल्हा कार्यकारिणी बैठक आज मोहोळ येथील सावली निवास येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या बैठकीत संघटनात्मक बांधणी, निवडणूक तयारी, तालुकानिहाय राजकीय परिस्थिती तसेच इच्छुक उमेदवारांच्या भूमिका यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी, “सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घड्याळ या चिन्हावरच लढवण्यासाठी सज्ज राहा,” असे स्पष्ट आणि ठाम आवाहन केले.

बैठकीदरम्यान माढा, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, पंढरपूर, करमाळा, अक्कलकोट, मंगळवेढा, बार्शी, सांगोला, मोहोळ व माळशिरस या तालुक्यांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र आढावा बैठका घेण्यात आल्या. प्रत्येक तालुक्यातील स्थानिक प्रश्न, कार्यकर्त्यांची ताकद, मतदारांचा कल आणि सध्याची राजकीय परिस्थिती याचा सखोल आढावा घेण्यात आला. याच बैठकीत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अधिकृत मागणी अर्जही स्वीकारण्यात आले.

मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष उमेश पाटील म्हणाले, “संघटना मजबूत करणे, तळागाळातील कार्यकर्त्यांना बळ देणे आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेणे हेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे धोरण आहे. आगामी निवडणुका एकजुटीने, नियोजनबद्ध पद्धतीने आणि पूर्ण ताकदीने लढवून सोलापूर जिल्ह्यात घड्याळाचा आवाज पुन्हा एकदा बुलंद करायचा आहे.”

या बैठकीला ज्येष्ठ नेते बळीराम काका साठे, माजी आमदार संजय मामा शिंदे, प्रदेश प्रतिनिधी कल्याणराव काळे, डॉ. धवलसिंह मोहिते पाटील, लतिफ भाई तांबोळी, बाळासाहेब बंडगर, महिला जिल्हाध्यक्षा वर्षा ताई शिंदे, युवती जिल्हाध्यक्ष ऋतुजा सुर्वे, युवक जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष मोतीराम चव्हाण, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष नजीर इनामदार, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत भालशंकर यांच्यासह सर्व तालुकाध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीच्या शेवटी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी शिस्तबद्ध, एकसंघ आणि प्रभावी तयारी करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सोलापूर जिल्ह्यात अधिक बळकट करण्याचा निर्धार सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकमुखाने व्यक्त केला.

Reactions

Post a Comment

0 Comments