स्थगितीचा निर्णय राजन पाटील व अनगर नगरपंचायतीसाठी धक्का नाही; निवडणूक प्रक्रिया फक्त पुढे ढकलली
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- अनगर नगरपंचायतीच्या बिनविरोध निवडणुकीस स्थगिती देण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे राजन पाटील यांना धक्का बसल्याची चर्चा सुरू असली, तरी प्रत्यक्षात हा निर्णय पाटील किंवा नगरपंचायतीतील नगराध्यक्ष व 18 सदस्यांसाठी धक्का नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
नवीन उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार का, आधी बाद केलेल्यांना पुनश्च संधी मिळणार का, अशा प्रश्नांचीही बाजारात चर्चा होती. मात्र, प्रशासनाने नियम स्पष्ट करत ही सर्व अटकळ थांबवली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज आधीच बाद करण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी सोलापूर सत्र न्यायालयात धाव घेतली; परंतु न्यायालयानेही त्यांचा दावा फेटाळून लावत त्यांच्या अपात्रतेची नोंद कायम ठेवली. यामुळे थिटे किंवा त्यांच्या श्रेणीतील कोणत्याही उमेदवाराला आता सुधारित निवडणूक प्रक्रियेत नवा अर्ज दाखल करण्याचा अधिकार नाही.
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ज्यांनी माघार घेतली आहे, ज्यांचे अर्ज बाद झाले आहेत, ते कोणीही सुधारित निवडणूक प्रक्रियेत अर्ज दाखल करू शकत नाहीत. निवडणूक नियमावलीनुसार बिनविरोध निवडणुकीचे सर्व टप्पे पार पडले असल्याने, स्थगितीचा निर्णय फक्त औपचारिक घोषणेचे वेळापत्रक पुढे ढकलणे इतपतच मर्यादित आहे. त्यामुळे सुधारित निवडणुकीत नवे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
स्थगितीमुळे नवी स्पर्धा, नव्या उमेदवारांची संधी, किंवा पाटील यांच्या स्थानाला धोका असे कोणतेही चित्र नाही.निवडणूक प्रक्रिया ज्या टप्प्यावर थांबली होती, तेथूनच पुढे सुरू होणार असून निवडणुकीचा निकाल किंवा उमेदवारांची स्थिती कोणत्याच प्रकारे बदलत नाही.
जिल्हा प्रशासनाने याबाबत स्पष्ट भूमिका घेत सांगितले की, “ही स्थगिती केवळ तांत्रिक आहे; बिनविरोध निवडणुकीची औपचारिक घोषणा पुढे ढकलली आहे. कोणत्याही पदाधिकारी किंवा उमेदवारासाठी हा धक्का नाही.”
नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्राजक्ता पाटील, व सर्व 18 सदस्य, यांना कोणताही धोका निर्माण झालेला नाही. त्यांच्या निवडीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी पुन्हा अधोरेखित केले.

0 Comments