समाजसेविका डॉ. प्रतिभाताई व्यवहारे यांचे अल्प आजाराने निधन
मोहोळ (कटूसत्य वृत्त) :- आष्टी गावातील परिचित समाजसेविका आणि मोहोळ पंचायत समितीच्या सदस्या सौ. डॉ. प्रतिभाताई अमित व्यवहारे यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्याने संपूर्ण मोहोळ तालुका शोकसागरात बुडाला आहे. त्यांच्या निधनाने एक सेवाभावी, कर्तव्यदक्ष आणि माणुसकीचा आदर्श जपणारी व्यक्ती हरपल्याची भावना समाजात व्यक्त होत आहे.
डॉ. प्रतिभाताई व्यवहारे यांनी कोरोना महामारीच्या काळात जिल्ह्यातील अनेक रुग्णांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी देवदूतासारखे काम केले होते. संसर्गाचा धोका असतानाही त्या रुग्णसेवा, औषध पुरवठा, अन्नधान्य वितरण, आरोग्य मार्गदर्शन यासाठी दिवस-रात्र मैदानात कार्यरत राहिल्या. त्यांच्या कार्यामुळे अनेकांचे प्राण वाचले. त्यामुळे त्यांना स्थानिक गावकऱ्यांकडून "देवदूत" ही उपाधी लाभली होती.
समाजातील प्रत्येक घटकांशी जिव्हाळ्याचा संबंध ठेवत त्यांनी महिलांसाठी विविध उपक्रम राबवले. मोहोळ पंचायत समितीवर सदस्य म्हणून काम करताना त्यांनी आरोग्य, पाणी, स्वच्छता, महिला सक्षमीकरण, शिक्षण अशा अनेक क्षेत्रांत भरीव कार्य केले. त्यांची मनमिळाऊ वृत्ती आणि समस्या सोडवण्याची तत्परता यामुळे त्यांना मोहोळ तालुक्यात विशेष स्थान मिळाले होते.
त्यांच्या अचानक निधनाने आष्टी व मोहोळ परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. विविध सामाजिक संघटनांनी, स्थानिक जनप्रतिनिधींनी आणि ग्रामस्थांनी त्यांच्या कार्याची आठवण करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या पश्चात पती डॉ.अमित व्यवहारे, कुटुंबीय, नातेवाईक असा परिवार आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली.

0 Comments