Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूरात गुरुवारी मनोरमा राज्यस्तरीय साहित्य संमेलन

 सोलापूरात गुरुवारी मनोरमा राज्यस्तरीय साहित्य संमेलन





परिसंवाद, काव्य मैफिलीसह विविध कार्यक्रमांची पर्वणी 



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मनोरमा सोशल फाउंडेशन संचलित, मनोरमा साहित्य मंडळी सोलापूर, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा पश्चिम (मनोरमा) सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मनोरमा राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन 2025 चे आयोजन गुरुवार, दि. 25 डिसेंबर रोजी हॉटेल बालाजी सरोवर येथे करण्यात आले आहे.परिसंवाद, काव्य मैफिलीसह विविध साहित्य कार्यक्रमांची पर्वणी मिळणार आहे. मनोरमा पुरस्काराने 10 मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे,  अशी माहिती मनोरमा परिवाराचे मार्गदर्शक तथा  साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीकांत मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
             या संमेलन स्थळाला सदाशिवराव मोरे साहित्य संमेलन सभागृह असे नाव देण्यात आले आहे. श्रीकांत मोरे यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होणार आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष शोभा मोरे, कार्याध्यक्ष अस्मिता गायकवाड, आधारस्तंभ माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, हर्षवर्धन पाटील हे आहेत. गुरुवार दि. 25 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, गोवा अकादमीचे अध्यक्ष अनिल सामंत, महाराष्ट्र शासनाच्या मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष रवींद्र शोभणे, माजी कामगार उपायुक्त संभाजीराव काकडे, ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे, ज्येष्ठ पत्रकार राजा माने, मनोरमा साहित्य संमेलनाचे कार्यवाह संतोष सुरवसे, संयोजक डॉ. सुमित मोरे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. 
         दुसऱ्या सत्रात सकाळी 11:45 वाजता विश्वास पाटील यांची प्रकट मुलाखत अश्विनी कोळेकर घेणार आहेत.  तिसऱ्या सत्रात 12.30 वाजता अध्यक्ष श्रीकांत मोरे यांची मुलाखत जयू भटकर, शिल्पा देशपांडे आणि अश्विनी कोळेकर घेणार आहेत. यावेळी नागेश पवार व सहकारी कविता सादरीकरण करणार आहेत. चौथ्या सत्रात दुपारी 1.30 'मराठी भाषा महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेर' या विषयावर दयानंद महाविद्यालयाचे प्रा. डॉ. राजशेखर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार असून त्यामध्ये डॉ. रवींद्र शोभणे, राजा माने, माजी शिक्षण उपसंचालक प्रदीप मोरे, ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र दास यांचा सहभाग राहणार आहे. पाचव्या सत्रात दुपारी 3.45 वाजता काव्य मैफिल कार्याध्यक्षा अस्मिता गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. 
            सहाव्या सत्रात दुपारी 4.15 वाजता 'मराठी चित्रपट सामना 50 वर्षांपूर्वी व आता' या विषयावर रामदास फुटाणे हे भाष्य करणार आहेत. सातव्या सत्रात 4.45  वाजता गायक वैभव जोशी यांची प्रकट मुलाखत शिल्पा देशपांडे घेणार आहेत. आठव्या सत्रात दुपारी 5.15 वाजता पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. यावेळी विश्वास पाटील, डॉ. प्रकाश महानवर, संभाजीराव काकडे, मिलिंद जोशी, रवींद्र शोभणे, अनिल सामंत, रामदास फुटाणे, संदीप काळे, राजन लाखे, सुनिताराजे पवार, सुमित मोरे, आदेश पायगुडे, जयू भाटकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी 'तणावविरहित जीवनशैली' या विषयावर डॉ. मृणालिनी मोरे, डॉ. तनुजा चिकने,  डॉ. संदीप तांबारे,  कविता अंधारे, संतोषी सुतार यांची व्याख्याने होणार आहेत. यानंतर नागेश पवार व त्यांचे सहकारी भैरवी सादरीकरण करणार आहेत.
          या पत्रकार परिषदेला शोभा मोरे, डॉ. ऋचा मोरे, अस्मिता गायकवाड, शिल्पा कुलकर्णी-मोहिते, पद्माकर  कुलकर्णी, मारुती काटकधोंड, विठ्ठल काळे, बदिउज्मा बिराजदार आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.


हे आहेत विविध पुरस्कारांचे मानकरी

या संमेलनात विविध पुरस्कारांनी मान्यवरांचा सन्मान केला जाणार आहे. यामध्ये गोव्याचे अनिल सामंत यांना मनोरमा बँक राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार, वैभव जोशी यांना मनोरमा बँक राज्यस्तरीय काव्यरत्न पुरस्कार, डॉ. मनीषा अतुल,अपूर्वा जोशी, संदीप काळे, डॉ. शिवाजी शिंदे यांना मनोरमा मल्टीस्टेट पुरस्कृत मनोरमा राज्यस्तरीय साहित्य सेवा पुरस्कार, नीलकंठ कदम, शिल्पा देशपांडे, अंजली करंजकर, सुनील साळुंके यांना स.रा. मोरे ग्रंथालयातर्फे मनोरमा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार देण्यात येणार आहे.

यांचा होणार यथोचित सत्कार 

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस आयुक्त एम. राजकुमार, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, आयर्न मॅन डॉ. अभिजीत वाकचौरे, डॉ. सत्यजित वाकचौरे, जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत,  ना.म.शिंदे, कृष्णा इंगोले , डॉ. नसीम पठाण, डी.बी.पाटील, राजेंद्र पवार आदी मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात येणार आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments