सोलापुरात ओला माव्याची सर्रास विक्री; गुटखाबंदीची खुलेआम पायमल्ली
सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- राज्य शासनाने गुटखा विक्री, उत्पादन व वाहतुकीवर कडक बंदी घातली असतानाही सोलापूर शहरात या आदेशांची खुलेआम पायमल्ली होत असल्याचे चित्र आहे. शहरातील टपऱ्या, पानपट्ट्या, किराणा दुकाने तसेच हॉटेलमधून विविध प्रकारचा गुटखा आणि ओला मावा सर्रास विकला जात असल्याचे आढळून येत आहे.
गुटखाबंदी लागू झाल्यानंतर काही व्यावसायिकांनी सुपारी व तंबाखू अशा वेगवेगळ्या पुड्यांची विक्री करून कायद्याला बगल देण्याचा प्रयत्न केला. शासनाने हा प्रकार लक्षात घेऊन अशा उत्पादनांवरही कारवाईचे आदेश दिले असले, तरी अर्थपूर्ण संबंधांच्या जोरावर ही विक्री आजही सुरूच आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गुटखा विक्रेत्यांचे फावले असून, बंदी केवळ कागदावरच उरल्याचे दिसून येते.
विशेष म्हणजे, शाळा व महाविद्यालय परिसराच्या १०० मीटरच्या आत तंबाखूजन्य पदार्थांची विक्री व सेवनास कायद्याने बंदी असतानाही अनेक शैक्षणिक संस्थांच्या आसपास गुटख्याची विक्री सुरू आहे. यामुळे शाळकरी मुले व महाविद्यालयीन तरुण मोठ्या प्रमाणावर या व्यसनाच्या आहारी जात आहेत. याबाबत पालकांनी तीव्र चिंता व्यक्त केली असून, सरकारी यंत्रणेच्या डोळेझाक धोरणामुळेच ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप केला आहे.
शहरातील मोठ्या वस्ती असलेल्या भागांत पानपट्ट्या, घरगुती दुकाने तसेच काही हॉटेल व किराणा दुकाने गुटख्याचे केंद्र बनली आहेत. काही विक्रेते तंबाखू, सुगंधी सुपारी व इतर घातक रसायनांचे मिश्रण करून ओला मावा तयार करीत असून, तो प्लास्टिकच्या पिशव्यांत भरून विकला जात आहे.
सोलापुरात ओला माव्याची वाढती विक्री आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणारी ठरत आहे. कमी वयातच कॅन्सर, जबड्याचे विकार, त्वचारोग यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. ओला मावा तयार करताना रेड बोला तंबाखू, एसटीडी नावाची तंबाखू, फरशीचा चुना, रंग येण्यासाठी केमिकलयुक्त पिवळा रंग तसेच घाण पाणी वापरले जात असल्याचे निदर्शनास येत आहे.
हे सर्व प्रकार उघडपणे सुरू असतानाही संबंधित यंत्रणांकडून ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. गुटखाबंदीची प्रभावी अंमलबजावणी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

0 Comments