येत्या आठ दिवसांत माढा तालुक्यातील सर्व गावांत ऊस तोडणीच्या टोळ्या : आ. अभिजित पाटील
माढा (कटूसत्य वृत्त) :- माढा तालुक्यातील सुमारे ७० टक्के गावांमध्ये विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या ऊस तोडणीच्या टोळ्या कार्यरत असून उर्वरित ३० टक्के गावांमध्ये येत्या आठ दिवसांत टोळ्या देण्यात येणार आहेत. त्यामुळे पुढील आठ दिवसांत माढा तालुक्यातील सर्व गावांमध्ये ऊस तोडणीच्या टोळ्या उपलब्ध होतील, असे प्रतिपादन आमदार अभिजित पाटील यांनी केले.
ते जाधववाडी (ता. माढा) येथे हनुमान मंदिरासमोरील सभामंडपाच्या भूमिपूजनप्रसंगी बोलत होते.आ. पाटील म्हणाले की, यंदा झालेल्या जास्त पावसामुळे २६५ जातीच्या उसाला तुरा आला आहे. तुरा आल्यानंतर उसाच्या वजनात घट येत असल्याने शेतकरी लवकरात लवकर ऊस तोडणीस देण्याचा प्रयत्न करीत आहेत. यावर्षी अनेक वाहनमालकांनी टोळ्या स्वतःच्या गावातच थांबवल्याने काही गावांत टोळ्यांची उपलब्धता जास्त, तर काही गावांत पूर्णपणे कमतरता निर्माण झाली होती. परिणामी ऊस तोडणीमध्ये अडचणी निर्माण झाल्या.
ही अडचण येत्या आठ दिवसांत पूर्णपणे दूर होईल, असे स्पष्ट करत आ. पाटील यांनी सांगितले की, आतापर्यंत विठ्ठल कारखान्याचे पावणे चार लाख मे. टन ऊस गाळप झाले असून सध्या प्रतिदिन दहा हजार मे. टन गाळप सुरू आहे. कारखान्याचा हंगाम सुरू होऊन आता एक महिना झाला असून पुढील पाच महिने कारखाना सुरू राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणतीही काळजी करू नये, असेही त्यांनी आश्वासन दिले.
विकासकामांविषयी बोलताना आ. पाटील म्हणाले की, मागील वर्षभर लाडकी बहीण योजना तसेच महापुरामुळे विकासकामांच्या निधीवर मर्यादा आल्या होत्या. मात्र आता निधी मिळण्यास सुरुवात झाली असून जाधववाडी येथील हनुमान मंदिरासमोरील सभामंडपासाठी दिलेला शब्द पूर्ण करण्यात आला आहे. त्याचबरोबर येथे ५१ घरकुलांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला असून पाणीपुरवठ्यासाठी अतिरिक्त डीपीसाठीही निधी मंजूर करण्यात आला आहे. एक शाळा खोली मंजूर झाली असून मार्चनंतर हे काम सुरू होईल.माढा तालुक्यातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागत असून उर्वरित प्रश्नही लवकरच सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे आश्वासन आमदार अभिजित पाटील यांनी दिले.
या कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य भारत आबा शिंदे, आनंद कानडे, राजाभाऊ चवरे, दीपक देशमुख, अंगद जाधव, शिवाजी भाकरे, विनंती कुलकर्णी, निलेश पाटील, सरपंच राहुल जाधव, विजय भाकरे, शिवाजी कन्हेरे यांच्यासह परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.png)
0 Comments