सर्व धर्मात माणुसकी हेच सर्वश्रेष्ठ धर्म- जितेंद्र आसोले
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आजच्या कलियुगात माणूस माणुसकी विसरत आहे. माणसाच्या मनात, बुद्धीत आणि विचारात चांगले विचार पेरणे हि काळाची गरज बनलेली आहे. अन्यथा निसर्गाने व परमेश्वरांनी दिलेले शरीर कचऱ्यासारखे जळून जाईल. मुक्या जनावरांची भाषा व वेदना समजून घेण्यातच खरी माणुसकी आहे. जनावरे असो की माणसं प्रत्येकांच्या सुखदुःखात धावून जाणे हेच माणुसकी धर्म आहे. चांगला माणूस बनलास तर पद, पैसा, प्रतिष्ठा तुझ्यामागे आपोआप येतात म्हणून माणसा, चांगला माणूस बन. सर्व धर्मात माणुसकी हेच सर्वश्रेष्ठ धर्म असल्याचे प्रतिपादन जितेंद्र आसोले (गोंदिया) यांनी केले.
निलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस कन्नड भाषा व कन्नड संस्कृती संवर्धक कुंभार समाज शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने श्री बृहन्मठ होटगी मठाचे परमपूज्य गुरुवर्य तपोरत्नं योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या आठव्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित तपोरत्नं बौद्धिक व्याख्यानमालेप्रसंगी दुसरे पुष्प गुंफताना आसोले बोलत होते. 'माणूस म्हणून जगताना' हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता.
आसोले पुढे म्हणाले,आजच्या यांत्रिक वेगाने धावणाऱ्या जगात माणूस सुख, संपत्ती व प्रतिष्ठेच्या शोधात असताना माणूसपण मात्र हळूहळू कोमेजत चालले आहे, या वास्तवाकडे त्यांनी श्रोत्यांचे लक्ष वेधले. जगणे म्हणजे केवळ श्वास घेणे नव्हे, तर अस्तित्वाला अर्थ देणारी मूल्यांची मशाल पेटवणे होय, असे सांगत त्यांनी आपल्या शब्दांतून श्रोत्यांच्या अंतर्मनाला साद घातली. माणूस म्हणून जगणे ही एक कला असून ती आत्मसंयम, करुणा, संवेदना व विवेकाच्या रंगांनीच साकारते, असे त्यांनी स्पष्ट केले.
स्वतःपुरते जगणे हे पशुत्व आहे, तर दुसऱ्यांसाठी जगणे हीच खरी माणुसकी, असे ठाम प्रतिपादन करत त्यांनी स्वार्थ, अहंकार आणि असंवेदनशीलतेच्या गर्द धुक्यात हरवलेल्या समाजाला आरसा दाखवला. दुःख पाहून डोळे ओलावणे, वेदना पाहून मदतीचा हात पुढे सरसावणे आणि अन्याय पाहून आवाज उठवणे — हाच माणूस म्हणून जगण्याचा खरा धर्म असल्याचे त्यांनी ठसक्यात मांडले.
आपल्या प्रभावी शैलीत बोलताना त्यांनी सांगितले,जीवन चंदनासारखे सुगंधी बनवा; कोळशासारखे काळवंडलेले नको. दगडांना पूजा करण्यापेक्षा जिवंत माणसांची पूजा करा.” माणूस मेल्यानंतर लाडूचा नैवेद्य दाखवून उपयोग नाही; आई-वडिलांना जिवंतपणी दोन घास प्रेमाने भरवणे हीच खरी भक्ती आहे, असा मार्मिक संदेश त्यांनी दिला.
आसोले पुढे म्हणतात,धर्म आणि भक्ती याबाबतही त्यांनी समाजाला विचार करायला लावणारे भाष्य केले. भक्ती देखणी असण्यापेक्षा विचार पवित्र असावेत,असे सांगत त्यांनी रामाचे विचार घ्या, रावणाचे नको; माणुसकी जपा, अहंकार टाळा, असे आवाहन केले. कपडे फाटके असतील तरी चालतील, पण विचार कधीही फाटके असू नयेत, हा संदेश श्रोत्यांच्या मनावर खोलवर ठसला.नाती, संस्कार आणि सामाजिक जबाबदारी यांचे महत्त्व उलगडताना त्यांनी स्पष्ट केले की, माणूस किती मोठा आहे हे त्याच्या पदावरून नव्हे, तर तो दुसऱ्याच्या दुःखात किती वेळा स्वतःला उभे करतो यावरून ठरते. तंत्रज्ञानाने अंतर कमी केले असले तरी मनांमधील दुरावा वाढला आहे; अशा वेळी संवाद, सहवेदना आणि प्रेम यांची मशागत करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
या व्याख्यानातील प्रत्येक शब्द विचारांची ठिणगी बनून श्रोत्यांच्या अंतःकरणात झिरपत होता. सभागृहात शब्दांचा गजर नव्हता, तर मौनातून जन्मलेले आत्मपरीक्षणाचे भारलेपण अनुभवास येत होते. श्रोते केवळ ऐकत नव्हते, तर स्वतःच्या जीवनाचा हिशेब मनाशी मांडत होते.
यावेळी संस्था अध्यक्ष अण्णाराव कुंभार, सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुभाष धुमशेट्टी, विजयकुमार हुल्ले, प्राचार्य रविशंकर कुंभार, मुख्याध्यापक शिवानंद मेणसंगी, मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार, वैशाली कुंभार, पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे यांच्यासह बहुसंख्य श्रोतेगण उपस्थित होते. सूत्रसंचालन शितल पाटील यांनी केले.
0 Comments