भाजपला घरचा आहेर; मानेंची प्रतीक्षा कायम
सोलापूर (कटूसत्य वृत):- भाजपमध्ये सत्तेची गोडी चाखण्यासाठी सुरू असलेले "इनकमिंग" थांबायचे नाव घेत नाही. पण या गर्दीत एक नाव मात्र अजूनही गेटवरच थांबले आहे, माजी आ. दिलीप माने. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांचा भाजप प्रवेश धूमधडाक्यात झाला, पण माने यांच्या प्रवेशाचे दरवाजे अद्याप बंदच आहेत.
भाजप आ. सुभाष देशमुख यांच्या समर्थकांनी भाजप कार्यालयासमोर केलेले धरणे, त्यानंतर मुंबईत प्रदेशाध्यक्षांची झालेली भेट, आणि आता कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी पाठवलेला प्रदेश निरीक्षक या साऱ्या घडामोडींनी माने यांच्या प्रवेशावरच मोठा प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
दरम्यान, पक्ष मेळाव्यात आ. सुभाष देशमुख यांनी केलेले वक्तव्य राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेत आले आहे. "भाजपमध्ये येणाऱ्यांना मशीनमध्ये घालून स्वच्छ करतो, डाग निघाले नाहीत तर नाईलाज आहे," असे देशमुख म्हणाले. सत्तेची फळे चाखण्यासाठी लोक रांगा लावत आहेत, पण ही फळे संपली की हेच लोक पक्ष सोडून निघून जातील, असा टोला त्यांनी मारला.
देशमुखांच्या या "घरच्या आहेराने" भाजपमध्ये हलकीशी खळबळ उडाली आहे. पक्षात नवीन येणाऱ्यांवर त्यांनी केलेली ही अप्रत्यक्ष टीका, माने यांच्या प्रतीक्षेच्या संदर्भात अधिक अर्थपूर्ण ठरत आहे. स्थानिक कार्यकर्त्यांमध्येही "कोण स्वच्छ, कोण डागाळलेला?" या चर्चेला उधाण आलं आहे.प्रकाश पाटील यांचा प्रवेश झाला असला, तरी माने यांचं दार मात्र अजूनही अडकलं आहे. प्रदेश निरीक्षकांचा अहवाल, देशमुखांची भूमिका आणि कार्यकर्त्यांचा दबाव या त्रिकोणात माने यांची एन्ट्री होणार की थांबणार, हे पाहणं आता सोलापूर जिल्ह्यातील सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.सत्तेच्या झाडावरून पडणाऱ्या या राजकीय फळांच्या गोडव्याला भाजप टिकवतो की गिळतो, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल. सध्या मात्र भाजपला "घरच्याच आहेराने" थोडा त्रास झालाच आहे, हे निश्चित!
0 Comments