Hot Posts

6/recent/ticker-posts

जुन्यांना ठेंगा, नवख्याच्या हाती भाजपाची सूत्रे; सोलापूर भाजपात नाराजीचा स्फोट!

 जुन्यांना ठेंगा, नवख्याच्या हाती भाजपाची सूत्रे; सोलापूर भाजपात नाराजीचा स्फोट!




सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- सोलापूर जिल्ह्यात भाजपाच्या पूर्व विभागात सत्तेचे समीकरणच उलटले आहे. दिग्गज नेते आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून नवख्या राम सातपुते यांच्या हाती निवडणूक प्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आणि यानंतर पक्षाच्या आत नाराजीचे वारे एवढे जोरात वाहू लागले आहेत की, पूर्व भागातील भाजपाचेच वातावरण हादरून गेलं आहे.

पूर्व सोलापुरात भाजपाची ताकद पायाभूत आहे. आ. सुभाष देशमुख, आ. विजयकुमार देशमुख, आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. देवेंद्र कोठे, आ. समाधान आवताडे, माजी आमदार राजन पाटील आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यासारख्या बड्या नेत्यांनी पक्षाचा पाया मजबूत केला. पण इतकी मोठी दिग्गजांची फौज असताना देखील नवख्या राम सातपुते यांच्या नेतृत्वाखालीच आता या मंडळींना काम करावं लागणार आहे. त्यामुळे ‘भाजपातील ज्येष्ठांना बाजूला सारून नवख्याची निवड का?’ असा सवाल थेट कार्यकर्त्यांमध्ये उमटला आहे.

शंकर वाघमारे सारख्या निष्ठावंत नेत्यांनी म्हणजेच “ज्यांनी पक्षासाठी आयुष्य घालवलं, त्यांनाच आज वगळलं जातंय... आणि नुकतेच पराभूत झालेले माजी आमदार सातपुते यांना नेतृत्वाचा सन्मान मिळतोय!” असं बोललं जातंय.

मागील काही दिवसांत सातपुते यांच्या नावावर वादाचे ढग दाटले होते. काही आरोपांमुळे त्यांच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. त्यामुळेच त्यांना पश्चिम भागातून ‘वगळून’ पूर्व भागात ‘ढकललं’ गेलं, असं राजकीय सूत्रांचं म्हणणं आहे. पण या हालचालीमुळे भाजपात पुन्हा एकदा अंतर्गत असंतोष उफाळल्याचं स्पष्ट होतंय.

पूर्व भागात आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी भाजपाचं भक्कम जाळं उभं केलं होतं. मात्र त्यांना आता पश्चिम भागात ढकललं गेलं असून, पूर्व भागाची सूत्रं सातपुते यांच्या हाती देण्यात आली आहेत. परिणामी, "काम आमचं, श्रेय दुसऱ्याचं!" असा सूर कार्यकर्त्यांमध्ये घुमतोय.

तसेच, या विभागासाठी प्रभारी म्हणून पालकमंत्री जयकुमार यांची नियुक्ती झाली आहे. सातपुते-जयकुमार ही जोडगोळी पश्चिम भागात आधीच वादग्रस्त ठरली होती, आणि आता हीच जोडी पूर्व भागात उतरवण्यात आल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये चीड वाढली आहे.

पक्षातली ही नाराजी निवडणुकीत भाजपाला महागात पडू शकते, अशी चर्चा जिल्ह्यात रंगली आहे. कारण, याच पूर्व भागात “हा बिडकर नको रे बाबा!” असा सूर उमटून भाजपाला लोकसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसला होता. आता पुन्हा असाच प्रयोग केल्याने सोलापूर भाजपात मतभेदांचा भडका उडण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

एकंदरीत, भाजपाने जुन्यांना वगळून नवख्यावर विश्वास टाकला, पण या निर्णयाने जुन्या कार्यकर्त्यांचा विश्वास डळमळीत होऊ लागलाय.“निष्ठा हवी, पण सन्मान नाही!” हा सूर आता सोलापूरच्या पूर्व विभागात ठळकपणे ऐकू येतोय.

Reactions

Post a Comment

0 Comments