निकंबेंचा भरणे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महानगरपालिकेचे माजी उपमहापौर विष्णू पैलवान निकंबे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश करून शहराच्या राजकारणात नवा अध्याय सुरू केला आहे. इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी येथे आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख दत्तात्रय मामा भरणे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी निकंबे यांचे राष्ट्रवादी परिवारात मनःपूर्वक स्वागत केले. पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देताना त्यांनी सांगितले की, “सोलापूर महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व आणखी बळकट करण्यासाठी सर्वांनी मिळून एकजुटीने, एकदिलाने काम करण्याची गरज आहे. पक्षाचे संघटन मजबूत झाले, तर सोलापूरच्या विकासाचा वेग अधिक वाढेल.”
विष्णू पैलवान निकंबे हे 2007 च्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उपमहापौरपदी निवडून आले होते. 2017 च्या निवडणुकीत त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून उमेदवारी घेतली होती. पुन्हा एकदा आपल्या जुन्या पक्षात परतत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारधारेवर निष्ठा दर्शवली आहे.
पक्षप्रवेशानंतर निकंबे म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली शिव–शाहू–फुले–आंबेडकरांच्या पुरोगामी विचारधारेवर आधारित पक्ष आहे. विकासाभिमुख समाजकारणाला अग्रक्रम देणारा हा पक्ष सदैव संघटनात्मक व सामाजिक बांधिलकी जपत आला आहे. या विचारसरणीतूनच सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कार्य करणार आहोत.”निकंबे यांच्या प्रवेशामुळे सोलापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसला नवी ऊर्जा प्राप्त झाल्याचे पक्ष पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या प्रवेशाला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार, कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान, प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे, माजी परिवहन सभापती आनंद मस्तरे, नगरसेवक गणेश पुजारी, तसेच अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या प्रवेशामुळे सोलापूरच्या राजकारणात नवी समीकरणं आकार घेत असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा आपल्या संघटनात्मक ताकदीचे प्रदर्शन केले आहे.
.png)
0 Comments