गादेकरांची पुन्हा शहर राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती
सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- सोलापूरच्या राजकारणात स्वतःचा ठसा उमटवणारे, युवक काँग्रेसपासून राष्ट्रवादी काँग्रेसपर्यंत कार्यकर्त्यांच्या मनावर राज्य करणारे महेश चंद्रकांत गादेकर यांची पुन्हा एकदा सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
महेश गादेकर यांनी महाविद्यालयीन जीवनातच समाजकारणास सुरुवात केली. 1992 साली त्यांनी सोलापूर शहर युवक काँग्रेसमध्ये उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले, तर केवळ चार वर्षांत 1996 मध्ये ते शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. 1997 च्या महापालिका निवडणुकीत त्यांनी तरुण नेतृत्वाला प्रोत्साहन देत सर्वाधिक युवक नगरसेवक निवडून आणले.
1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर ते शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यांच्या संघटनकौशल्यामुळे 2010 मध्ये त्यांच्यावर शहर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यांच्या नेतृत्वाखाली 2012 च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक 17 नगरसेवक निवडून आणले, ही त्यांच्या कार्यक्षम नेतृत्वाची साक्ष देणारी बाब ठरली.
2014 मध्ये त्यांनी सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून आपली राजकीय ताकद दाखवून दिली. शरदचंद्र पवार साहेबांच्या संसदीय कारकिर्दीच्या 50 वर्षांच्या निमित्ताने सोलापूरात त्यांनी घेतलेला भव्य कार्यक्रम राज्यभर गाजला होता.
फक्त राजकारणच नव्हे तर सामाजिक क्षेत्रातही त्यांनी मोठं काम केलं आहे. ‘फिरता दवाखाना’ ही त्यांची संकल्पना सलग पाच वर्षे राबवली गेली आणि त्यातून सुमारे पाच लाख नागरिकांवर मोफत उपचार करण्यात आले.
क्रीडा क्षेत्रातही त्यांचे योगदान लक्षणीय आहे. ते शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित झाले असून सध्या ते महाराष्ट्र राज्य खोखो असोसिएशनचे उपाध्यक्ष, तसेच सोलापूर शहर जिल्हा फेडरेशन आणि फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या पुढाकाराने 2015 साली सोलापूर शहरात पहिल्यांदाच राष्ट्रीय स्तरावरील खो-खो स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
राजकारण, समाजकारण आणि क्रीडा या सर्व क्षेत्रांत महेश गादेकर यांनी दाखवलेले नेतृत्व आणि कार्यक्षमता पाहता, सोलापूरच्या राजकारणात त्यांच्या नव्या भूमिकेची चर्चा सध्या शहरभर रंगत आहे.
.png)
0 Comments