जिल्ह्यात १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान कुष्ठरुग्ण शोध अभियान
सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्यात १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२५ या कालावधीत कुष्ठरुग्ण शोध अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या अनुषंगाने जिल्हा समन्वय समितीची सभा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली.
या अभियानाचा उद्देश समाजात असलेल्या प्रत्येक संशयित कुष्ठरुग्णांचा शोध घेऊन त्यांचे निदान निश्चित करणे व आवश्यक असल्यास तात्काळ बहुविध औषधोपचार सुरू करून संसर्गाची साखळी खंडीत करणे आहे.
मार्गदर्शक सूचनांनुसार सोलापूर जिल्ह्यातील ३६,५७,५९० लोकसंख्या प्रत्यक्ष तपासणीसाठी निवडण्यात आली आहे. यासाठी २७६८ स्त्री-पुरुषांचे पथक तयार करण्यात आले असून ही पथके घरोघरी जाऊन शारीरिक तपासणी करून संशयित कुष्ठरुग्णांचा शोध घेतील. संशयितांची वैद्यकीय तपासणी अधिकृत डॉक्टरांकडून करण्यात येणार असून निदान निश्चित झाल्यास तात्काळ औषधोपचार सुरू केले जातील.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री
जंगम यांनी नागरिकांना आपल्या घरी येणाऱ्या पथकाकडून तपासणी करून घ्यावे व अभियान यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
लक्षात असू द्या :- सर्व सांसर्गिक रोगांपैकी कुष्ठरोग हा सर्वात कमी संसर्गजन्य रोग आहे.
- नियमित, योग्य व पुरेशा औषधोपचाराने कुष्ठरोग पूर्णपणे बरा होतो.
- कुष्ठरोग कोणालाही होऊ शकतो.
- कुष्ठरोगाचे मोफत निदान व उपचार सर्व शासकीय व निमशासकीय रुग्णालयात दररोज उपलब्ध आहेत.
या अभियानात कुलदीप जंगम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. नंदकुमार घाडगे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अभिवंत, डॉ. वाळवेकर (मनपा, सोलापूर), कुष्ठरोग विभागातील वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोडसे व डॉ. सुनंदा राऊतराव, सर्व तालुका अधिकारी तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानचे सर्व जिल्हा समन्वयक सहभागी आहेत.
*******

0 Comments