खा धैर्यशील मोहिते पाटील यांच्या संकल्पनेतून वैचारिक परिसंवाद व व्याख्यानमाला संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, February 21, 2026

खा धैर्यशील मोहिते पाटील यांच्या संकल्पनेतून वैचारिक परिसंवाद व व्याख्यानमाला संपन्न

 खा धैर्यशील मोहिते पाटील यांच्या संकल्पनेतून वैचारिक परिसंवाद व व्याख्यानमाला संपन्न



 
अकलूज (कटूसत्य वृत्त):- खासदार धैर्यशील मोहिते-पाटील व सौ. शितलदेवी मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवजयंतीनिमित्त वैचारिक परिसंवाद व व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. “शिवजयंतीला महापुरुषांची व्याख्याने व्हावीत” या संकल्पनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी यावेळी करण्यात आली.

इतिहास विश्लेषक डॉ. दत्तात्रय मगर यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ युद्धे जिंकली नाहीत, तर शेती, व्यापार आणि पायाभूत सुविधांवर भर देत स्वराज्य आर्थिक व सांस्कृतिकदृष्ट्या बळकट केले. किल्ले, रस्ते व सिंचन व्यवस्थेवर त्यांनी दिलेला भर हा आधुनिक विकासाचा पाया ठरला असे सांगितले.

शिवरत्न नॉलेज सिटी, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा अकलूज, सिंहगर्जना ग्रुप व जाणीव मैत्री ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. व्यासपीठावर इशिता मोहिते-पाटील, प्रा. सुहास उरवणे, डॉ. पांडुरंग नलवडे, प्रा. अनिल लोंढे, विक्रम वैद्य, डॉ. अमोल माने शेंडगे, अनिल जाधव, डॉ. विश्वनाथ आवड आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रा. अनिल लोंढे यांनी महात्मा जोतिराव फुले यांनी १८७० साली शिवजयंतीची सुरुवात करून समाजजागृतीचा पाया रचल्याचा उल्लेख केला.‌प्रा. सुहास उरवणे यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या ‘अनुभव मंटप’ या लोकशाही संकल्पनेवर प्रकाश टाकत समता, न्याय व सुशासनाच्या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले.डॉ. विश्वनाथ आवड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक संघर्षाचा आढावा घेत समान हक्कांच्या लढ्याची आठवण करून दिली.विक्रम वैद्य यांनी गड-किल्ले संवर्धनाची गरज व्यक्त केली, तर अनिल जाधव यांनी तरुणाईला इतिहासाशी जोडण्यासाठी अशा वैचारिक उपक्रमांची आवश्यकता अधोरेखित केली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विकासाभिमुख धोरणांपासून महात्मा फुले, महात्मा बसवेश्वर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक व लोकशाही मूल्यांपर्यंत विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन नागनाथ साळवे यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages