शाश्वत शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा(ए.आय) वापर याविषयी व्याख्यान संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, February 21, 2026

शाश्वत शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा(ए.आय) वापर याविषयी व्याख्यान संपन्न

 शाश्वत शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा(ए.आय) वापर याविषयी व्याख्यान संपन्न




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित लोकमंगल कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या रासेयो शिबिरांतर्गत मौजे रानमसले ता. उत्तर सोलापूर येथे "शाश्वत शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर" याविषयी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानासाठी मार्गदर्शक म्हणून डॉ. भगवान सूर्यवंशी (कृषी सल्लागार व मार्गदर्शक, फायलो प्रायव्हेट लिमिटेड बंगळूरु) व अतुल जाधव (समन्वयक, फायलो प्रायव्हेट लिमिटेड बंगळूरु) हे लाभले होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अपर्ण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर डॉ. भगवान सूर्यवंशी यांनी उपस्थित ग्रामस्थांना शाश्वत शेती म्हणजे काय व त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कसा फायदेशीर आहे याविषयी मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी  सांगितले की शाश्वत शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर केल्याने संसाधनांची बचत, पर्यावरणाचे रक्षण आणि उत्पादनात वाढ होते. याद्वारे अचूक शेतीमध्ये सॅटेलाईट इमेज आणि ड्रोनच्या मदतीने शेतातील मातीचा दर्जा, ओलावा आणि पिकांची वाढ तपासली जाते. यामुळे संपूर्ण शेतात खते किंवा पाणी न वापरता जिथे गरज आहे तिथेच वापर करणे शक्य होते. एआय सेन्सर्स जमिनीतील ओलावा आणि हवामानाचा अंदाज घेऊन पिकांना नक्की कधी आणि किती पाण्याची गरज आहे हे ठरवतात. यामुळे २५% पर्यंत पाण्याची बचत होऊ शकते. पिकांवरील रोगांची सुरुवातीच्या काळातच ओळख पटवण्यासाठी एआय आधारित इमेज प्रोसेसिंगचा वापर महत्वपूर्ण ठरतोय. यामुळे कीटकनाशकांचा अनावश्यक वापर कमी करण्यासाठी मदत होऊ शकते. जमिनीतील पोषक तत्वांच्या कमतरतेचे विश्लेषण करून नेमकी कोणती खते किती प्रमाणात वापरावीत, याचे अचूक मार्गदर्शन शेतकऱ्यांना एआय तंत्रज्ञानामुळे मिळणे शक्य झाले आहे. ग्रामस्थांनी शाश्वत शेती व ए आय संबंधित विविध विषयांवर त्यांच्याशी चर्चा करून आपल्या शंकाचे निरसन करून घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भक्ती बिडवे व बुशरा शेख यांनी केले. या कार्यक्रमास लोकमंगल कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्रा. आशिष सरकाळे, प्रा. वर्षा मानेदेशमुख, सर्व रानमसले ग्रामस्थ तसेच रासेयो स्वंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गावचे सरपंच मनोहर क्षीरसागर, उपसरपंच रमेश सुतार, सर्व रानमसले ग्रामपंचायत सदस्य, लोकमंगल कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य सागर महाजन यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व रासेयो स्वयंसेवकांनी मोलाची भूमिका पार पाडली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages