करमाळा निवडणूक : नेतृत्व, विकास आणि स्वच्छ प्रशासनाचा कौल
करमाळा (कटूसत्य वृत्त):- यंदा करमाळा नगरपरिषदेची निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची चिन्हे असून, नेतृत्वाबरोबरच नागरिकांना मिळणाऱ्या मूलभूत सुविधा, विकास आणि पारदर्शक तसेच भ्रष्टाचारमुक्त प्रशासन हा प्रमुख मुद्दा ठरणार आहे. नगराध्यक्षपद आणि १० प्रभागांतील एकूण २० नगरसेवकांच्या निवडीसाठी प्रक्रिया सुरू असून विविध पक्ष आणि आघाड्या यात उतरल्या आहेत.
शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार जयवंतराव जगताप आणि जिल्हाप्रमुख महेश चिवटे, भाजपकडून रश्मी बागल, गणेश चिवटे व कन्हैयालाल देवी, तर करमाळा शहर विकास आघाडीकडून सुनील सावंत, अॅड. राहुल सावंत आणि माजी नगरसेवक संजय सावंत यांच्यात तिरंगी लढत निर्माण झाली आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसमधील असंतुष्ट तसेच काही अपक्ष उमेदवारही मैदानात उतरण्याची शक्यता आहे.
निवडणुकीदरम्यान शहरातील प्रमुख समस्या – रस्ते व गटारे, कार्यक्षम पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी, भटकी जनावरे, आरोग्य सुविधा, कचरा व्यवस्थापन, शहर सुशोभीकरण आणि नागरिकांसाठी सार्वजनिक सुविधांची उपलब्धता यांभोवती प्रचार फिरण्याची शक्यता आहे. नागरिकांची अपेक्षा दीर्घकालीन विकास योजनांकडे असून तात्पुरत्या उपाययोजनांपलीकडे जाऊन जबाबदारीने कारभार व्हावा, अशी मागणी आहे.
करमाळा शहर स्वच्छ, आधुनिक आणि नागरिकाभिमुख व्हावे, तसेच नगरपरिषदेचा कारभार पारदर्शक आणि उत्तरदायी असावा, अशी जनतेची भूमिका स्पष्ट होत असून, यंदाची निवडणूक नेतृत्वाच्या परीक्षेची ठरणार आहे.

0 Comments