ऐनवेळी प्रभाग दहा मधून उमेदवारीचा पत्ता कट झाल्यामुळे लेंगरे परिवाराला मोठा धक्का
पक्षस्तरावरून त्यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू
भविष्यातील राजकीय पुनर्वसनाचा शब्द मिळाल्यास सागर लेंगरे पुन्हा सक्रिय होण्याची समर्थकांची भावना
मोहोळ (कटूसत्य वृत्त):-
प्रभाग क्रमांक दहा मधून भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी गेल्या दोन महिन्यापासून सातत्याने प्रयत्नशील असलेले सागरदादा लेंगरे हे त्यांच्या सुविदय पत्नी सारिका सागर लेंगरे यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्यामुळे काहीसे नाराज अवस्थेत आहे. उमेदवारीचा निर्णय जाहीर झाल्यापासून ते निवडणुकीच्या वातावरणापासून काहीसे अंतर ठेवून तर आहेत. मात्र कोणाचीही त्यांचा संपर्क नसल्यामुळे लेंगरे यांची येत्या काळातील नक्की भूमिका काय ? याबाबत मोठी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पक्षस्तरावरून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू असून लवकरच पक्षाचे पदाधिकारी त्यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करून त्यांना निवडणूक विषयक कामात सक्रिय करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे समजते.
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे,भाजप नेते आमदार सुभाषबापू देशमुख, माजी जिल्हाध्यक्ष तथा अक्कलकोटचे आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी, जिल्हाध्यक्ष शशिकांतनाना चव्हाण मोहोळ तालुक्याचे भाजप नेते तथा माजी आमदार राजन पाटील, लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील, सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील, तालुकाध्यक्ष सतीश काळे निवडणूक प्रभारी सुशील भैय्या क्षीरसागर या सर्वांना भेटून सागर लेंगरे यांनी या प्रभागातून निवडणूक लढविण्याची उत्कट इच्छा असून पक्ष स्तरावरून माझ्या परिवारातील उमेदवारीचा विचार व्हावा अशी आर्त विनवणी वेळोवेळी केली .
यावेळी त्यांना सकारात्मक प्रतिसाद आल्यामुळेच त्यांनी प्रभागात मोठ्या प्रमाणात स्वखर्चातून विविध उपक्रम राबवत जनसंपर्क वाढवला. शिवाय उत्साहात त्यांनी आपला अपक्ष म्हणून तर आपल्या पत्नी सारीका यांचा उमेदवारी अर्ज देखील दाखल केला. असे असताना अचानक त्यांच्या उमेदवारीचा पत्ता कट झाल्यामुळे लेंगरे परिवार सध्या प्रचंड मानसिक धक्क्यातून जात आहे. एबी फॉर्म त्यांना उपलब्ध न झाल्यामुळे त्यांच्या पत्नीचा अर्ज जरी बाद झाला तरी सागर यांचा अर्ज अदयाप शाबूत आहे. त्यामुळे निवडणुकीतील या परिवाराची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र काहीही झाले तरी ते पक्षाविरोधात भूमिका न घेता पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या भविष्यातील राजकीय पुनर्वसनाचा शब्द दिल्यास निश्चितपणे पुन्हा सक्रिय होतील असा विश्वास त्यांच्या समर्थकांनी बोलून दाखवला.
.jpg)
0 Comments