उजनी धरणग्रस्ताचे अमरण उपोषण तापले; नोकरी दिली नाही तर पंपहाऊस ठप्प करण्याचा ग्रामस्थांचा इशारा! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, November 29, 2025

उजनी धरणग्रस्ताचे अमरण उपोषण तापले; नोकरी दिली नाही तर पंपहाऊस ठप्प करण्याचा ग्रामस्थांचा इशारा!

 उजनी धरणग्रस्ताचे अमरण उपोषण तापले; नोकरी दिली नाही तर पंपहाऊस ठप्प करण्याचा ग्रामस्थांचा इशारा!



टेंभुर्णी(कटूसत्य वृत्त):-
माढा तालुक्यातील उजनी (टे) येथील एनटीपीसी पंपहाऊससमोर गेल्या पाच दिवसांपासून धरणग्रस्त शेतकरी उत्तरेश्वर पाटील अमरण उपोषणावर बसले असून त्यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. कंपनीकडून अन्याय्यरीत्या कामावरून काढून टाकल्याच्या निषेधार्थ त्यांनी सुरू केलेल्या उपोषणाला ग्रामस्थांचा मोठा पाठिंबा मिळत असून परिस्थिती चिघळत चालली आहे.

एनटीपीसीने येत्या दोन दिवसांत पाटील यांना पुन्हा रुजू करून घेतले नाही, तर पंपहाऊसचे मुख्य गेटच कुलूपबंद करून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी जाहीरपणे दिला आहे. त्यामुळे एनटीपीसी प्रशासनावर दबाव वाढला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील फताटेवाडी येथे एनटीपीसीचा वीज प्रकल्प असून त्यासाठी लागणारे पाणी उजनी धरणातून उजनी (टे) पंपहाऊसमार्फत पुरवले जाते. १७ ते १९ कर्मचारी या पंपहाऊसवर कार्यरत आहेत. कंपनी सुरू झाल्यापासून उत्तरेश्वर पाटील हेल्पर पदावर काम करत होते.

काही महिन्यांपूर्वी त्यांना उजनीहून फताटेवाडी प्रकल्पावर कामासाठी नेण्यात आले. तिथे तीन महिने काम करून घेतल्यानंतर त्यांना पुन्हा उजनी येथे परत बदली देण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. मात्र प्रत्यक्षात बदली न देता थेट कामावरून काढून टाकल्याचा गंभीर आरोप पाटील यांनी केला आहे.
सर्वात गंभीर बाब म्हणजे—पाच दिवसांपासून मुख्य गेटवर उपोषणास बसलेल्या पाटील यांची आतापर्यंत एकाही कंपनी अधिकाऱ्याने विचारपूसही केलेली नाही, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. यामुळे ग्रामस्थांत संतापाची लाट आहे.

या आंदोलनाच्या ठिकाणी सरपंच सतीश पाटील, उपसरपंच मल्हारी गवळी, अक्षय पाटील, अमोल पाटील, आबा तनपुरे, बाळासाहेब पाटील, नानासाहेब शेळके, जीवन दास, संतोष मेटे, संतोष पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामस्थांनी स्पष्ट केले—“धरणाचे पाणी तुम्हाला, पण धरणग्रस्तांचा घास का हिरावून घेताय?”

उजनीत सुरू झालेले हे उपोषण दिवसेंदिवस उग्र होत असून, एनटीपीसी प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास पंपहाऊस ठप्प होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages