संविधान बचाव समितीचा सोलापुरात बुधवारी महामोर्चा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- संविधान बचाव समितीच्या वतीने बुधवार दि. 26 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात मुस्लिम, भटके विमुक्त, बौद्ध यांच्यासह बहुजन समाजातील सुमारे एक लाख नागरिक, कार्यकर्ते संविधान समर्थक सहभागी होणार आहेत, अशी माहिती ज्येष्ठ नेते तथा निमंत्रक सुभानजी बनसोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
संविधानाचा अंमल सुरू होऊन 75 वर्षाचा कालावधी लोटला आहे. संविधानामुळेच विविध जाती धर्माचे आणि विविध भाषा बोलणारे लोक एकत्र नांदत आहेत. संविधानामुळेच भारत अखंड आणि एकात्म राहिला आहे. सर्वांना स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय प्रदान केला जात आहे असे असतानाही भारतीय संविधानाला संपविण्याचे कट कारस्थान रचले जात आहे. त्यामुळे देशाचे संविधान वाचवावे या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
बुधवारी सकाळी 11 वाजता संविधान समर्थकांचा हा महामोर्चा न्यू बुधवार पेठ येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथून निघणार आहे. पुढे सम्राट चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक, नवी वेस पोलीस चौकी मार्गे सरस्वती चौक, चार हुतात्मा पुतळा चौक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय पुनम गेट येथे या मोर्चाचा समारोप होणार आहे. या ठिकाणी या मोर्चाचे सभेत रूपांतर होईल. या मोर्चामध्ये बहुजन समाजातील संविधान समर्थक सर्व घटकांचा सहभाग राहणार आहे. सोलापूर शहर जिल्ह्यातील लोक लाखोच्या संख्येने उपस्थिती दर्शविणार आहेत.
राष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांना अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. देशात वाढलेली बेरोजगारी, विद्यार्थी, शेतकऱ्यांचे, कामगार कष्टकरी, शेतमजुरांचे प्रश्न, सरकारचे शैक्षणिक धोरण, शिष्यवृत्ती, कंत्राटी पद्धत बंद करून सुशिक्षित बेरोजगारांना सरकारी नोकऱ्या देणे, शिक्षणाचे खाजगीकरण थांबवावे, वैज्ञानिक दृष्टिकोनातून मोफत शिक्षण द्यावे, आरएसएस सह सर्व एनजीओची सक्तीने नोंदणी करावी, आरक्षणातील अ - ब- क- ड वर्गीकरण रद्द करावे, एससी, एसटी, ओबीसी यांना क्रिमीलेअर लावू नये, आरएसएस या संघटनेवर बंदी घालावी यासह इतर मागण्यांसाठी हा महामोर्चा काढण्यात येणार आहे, असे निमंत्रक सुभानजी बनसोडे यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेस जनार्दन शिंदे, अशोक जानराव, अण्णासाहेब भालशंकर, राजा सोनकांबळे, मिलिंद प्रक्षाळे, रॉकी बंगाळे, अशोक आगावणे, सच्चिदानंद व्हटकर , प्रमिला तूपलवंडे, संध्या काळे , व्ही. डी. गायकवाड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

0 Comments