देशासाठी काहीतरी कार्य करणं प्रत्येकाचं कर्तव्य - चिथडे
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- भविष्यातील पिढीचा मन, मेंदू आणि मनगट सक्षम करण्यासाठी प्रत्येकाने कार्य केलं पाहिजे. देशप्रेमाचं बाळकडू मुलांना देणे गरजेचे आहे. आयुष्याचा प्रवास करत असताना देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो. आणि त्या देशासाठी काहीतरी कार्य करणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. कर्तव्याच्या भावनेतून आपण कार्यरत रहावे, असे मत सोल्जर्स इंडिपेन्डंट रिहॅबिलिटेशन फाउंडेशन या संस्थेच्या सुमेधा चिथडे यांनी व्यक्त केले.
प्रिसिजन फाउंडेशनतर्फे आयोजित 'प्रिसिजन गप्पा २०२५' या सांस्कृतिक मेजवानीच्या समारोप कार्यक्रमाप्रसंगी चिथडे बोलत होत्या. यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. सुहासिनी शहा यांनी प्रिसिजन फाउंडेशनच्या विविध सामाजिक उपक्रमांचा आणि कार्याचा आढावा सादर केला. त्यानंतर सन्मान सोहळ्याची मुख्य सूत्रधार म्हणून प्रख्यात वक्ते, पत्रकार आणि मुलाखतकार डॉ. उदय निरगुडकर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. पुरस्कार सोहळ्यानंतर डॉ. उदय निरगुडकर यांनी सुमेधा चिथडे आणि अधिक कदम यांची संवादात्मक मुलाखत घेतली. अधिक कदम यांनी सांगितले की, 'काश्मिरी पंडित आणि काश्मिरी मुस्लिम यांचा डीएनए एकच आहे. फरक फक्त धर्माचा आहे, पण माणुसकी तीच आहे.' त्यांनी काश्मिरीयत आणि महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय यामधील साम्यही अधोरेखित केले. 'माझ्यावर कधीच इस्लाम धर्म स्वीकारण्याचा दबाव आला नाही,' असे ते म्हणाले.
दहशतवाद्यांनी एकूण १९ वेळा त्यांना उचलून नेले, तरीही त्यांनी मानवतेचा मार्ग सोडला नाही. अनेक काश्मिरी मुलींचे शिक्षण पूर्ण करून देणे आणि विवाहाची जबाबदारी उचलणे हे त्यांचे कार्य प्रेरणादायी ठरले आहे. त्यांच्या संघर्षमय प्रवासातील या अनुभवांनी उपस्थित प्रेक्षक भारावून गेले. विलास कुलकर्णी यांचे अभंग सादरीकरण झाले. अधिक कदम हे उत्तम पखवाजवादक असल्याने कुलकर्णी यांच्या अभंगाला अधिक कदम यांनी पखवाजाची साथसंगत केली.
चौकट १
अधिक कदम यांना ' सुभाष रावजी शहा स्मृती पुरस्कार'
बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून काश्मीरमधील दहशतवाद, युद्ध आणि अराजकतेमुळे अनाथ झालेल्या मुला-मुलींच्या पुनर्वसनाचे कार्य अधिक कदम यांनी गेल्या ३० वर्षांपासून निष्ठेने केले आहे. त्यांना २ लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे स्वरूप असलेला 'प्रिसिजन सुभाष रावजी शहा स्मृती पुरस्कार' प्रदान करण्यात आला.
सुमेधा चिथडे यांना 'प्रिसिजन सामाजिक कृतज्ञता पुरस्कार'
सोल्जर्स इंडिपेन्डंट रिहॅबिलिटेशन फाउंडेशन या संस्थेच्या वतीने सियाचेन या जगातील सर्वोच्च रणभूमीवर ऑक्सिजन जनरेशन प्लांट सुरू करून तेथील सैनिक आणि पर्यटकांना जीवनदायी श्वास देण्याचे कार्य सुमेधा चिथडे यांनी केले आहे. त्यांच्या या सेवेसाठी ३ लाख रुपयांचा प्रिसिजन सामाजिक कृतज्ञता पुरस्कार आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
प्रिसिजन सेवा सन्मानाचे मानकरी
वृत्तपत्र विक्रेत्या- ऋचा पाठक, महिला रिक्षाचालक-अंबिका पानगंटी, मनोरूग्णांसाठी कार्य-मोहन तलकोक्कुल, व्यसनमुक्ती - रामचंद्र वाघमारे, मासिक पाळी संबंधात प्रबोधन- राहुल बिराजदार, अतुल गवळी आणि विजयसिंह उबाळे - महापुरात ४० जणांचा जीव वाचवला, सलूनमध्ये वाचनालय - कैलास काटकर, कोरोनात अनेकांचा अंत्यविधी- राजू डोलारे, अंध असताना विविध कार्य संजय बैरागी

0 Comments