Hot Posts

6/recent/ticker-posts

टीईटी सक्तीविरोधात शिक्षकांचा ज्वालामुखी — सोलापूरमध्ये हजारोंचा मूक मोर्चा

 टीईटी सक्तीविरोधात शिक्षकांचा ज्वालामुखी — सोलापूरमध्ये हजारोंचा मूक मोर्चा


सोलापूर (कटूसत्य वृत्त) :– टीईटी परीक्षा सक्तीची केल्याने राज्यातील प्राथमिक शिक्षकांचे भविष्य धोक्यात आले असून, या निर्णयाविरोधात शिक्षक वर्गात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या अन्यायकारक निर्णयाविरोधात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने रविवारी हजारो शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढून शासनाविरोधात ठिय्या दिला.

चार हुतात्मा चौकातून सकाळी ११ वाजता निघालेल्या या मोर्चात जिल्ह्यातील जिल्हा परिषद तसेच खासगी शाळांमधील सुमारे २५ पेक्षा अधिक शिक्षक संघटना सहभागी झाल्या होत्या. “आमचा अनुभव हीच आमची पात्रता”, “अन्यायकारक टीईटी रद्द करा”, “लढाई अस्तित्वाची – टीईटी सक्तीविरोधाची” अशा घोषणा देत शिक्षकांनी मूक पण ठाम पद्धतीने शासनाच्या निर्णयाविरोधात आपला संताप व्यक्त केला.

सर्वोच्च न्यायालयाच्या १ सप्टेंबर २०२५ च्या निर्णयानुसार, ज्या शिक्षकांची निवृत्ती होण्यासाठी पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधी उरला आहे, त्यांनी दोन वर्षांच्या आत टीईटी परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. अन्यथा दोन वर्षांनंतर त्यांना सक्तीची निवृत्ती घ्यावी लागणार आहे. या आदेशामुळे हजारो शिक्षकांच्या उपजीविकेवर गंडांतर आले असून, शिक्षकांचे आयुष्य उद्ध्वस्त होणार असल्याची भावना शिक्षकमंडळात व्यक्त होत आहे.

मोर्चाच्या शेवटी जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराजवळ झालेल्या सभेत शिक्षक नेत्यांनी शासनावर जोरदार टीका केली. “१५ मार्च २०२४ ची अन्यायकारक संचमान्यता, शिक्षणसेवक योजना, जुनी पेन्शन योजना बंद करणे, प्राथमिक शाळांमधून लिपीक-शिपाई पदे कमी करणे, बीएलओ आणि ऑनलाईन कामांचा भडीमार — हे सर्व अन्यायकारक निर्णय शिक्षकांच्या मनोबलावर घाव घालणारे आहेत. पण आता मात्र ही लढाई आपल्या अस्तित्वाची आहे,” असे शिक्षक नेत्यांनी स्पष्ट केले.



Reactions

Post a Comment

0 Comments