सोलापुरात धनंजय मुंडे यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेस जोडे मारो आंदोलन; मनोज जरांगे प्रकरणावर संताप
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी तीन आरोपींना अटक झाल्यानंतर, या कटामागे माजी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे नाव आल्याची चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर सोलापुरात सकल मराठा समाजाच्या वतीने शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज चौकात संतप्त आंदोलन करण्यात आले.
यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी धनंजय मुंडे यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेस जोडे मारले आणि त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. “जर मनोज जरांगे यांच्या केसाला धक्का लागला, तर त्याचे परिणाम राज्य सरकारला पाहावे लागतील,” असा इशारा आंदोलकांनी दिला.
सकल मराठा समाजाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी या आंदोलनातून शासनावर आणि संबंधित नेत्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी जरांगे यांच्या सुरक्षेबाबत तातडीने पावले उचलण्याची मागणी केली. आंदोलनादरम्यान “मराठा समाजाचा अपमान सहन केला जाणार नाही”, “मनोज जरांगे अमर राहो” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
या आंदोलनात माऊली पवार, महेश पवार, सुनील शेळके, दिनेश डोंगरे, सचिन गुंड, विजय पोखरकर, महादेव गवळी, अरविंद गवळी यांच्यासह सकल मराठा समाजाचे पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी घटनास्थळी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. आंदोलन शांततेत पार पडले असले, तरी मराठा समाजात जरांगे प्रकरणामुळे संतापाचे वातावरण कायम आहे.
राज्यातील राजकीय वर्तुळात या आंदोलनामुळे खळबळ उडाली असून, धनंजय मुंडे यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. मराठा समाजाच्या भावना भडकलेल्या असताना, राज्य सरकार आणि पोलिस प्रशासन यापुढे कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0 Comments