Hot Posts

6/recent/ticker-posts

“करून वोटचोरी सुरूय महाराष्ट्राची लुटमारी!” फडणवीस सरकारच ‘मलिदा गँग’ -आ. पवार

 “करून वोटचोरी सुरूय महाराष्ट्राची लुटमारी!” फडणवीस सरकारच ‘मलिदा गँग’ -आ. पवार





पुणे (कटूसत्य वृत्त) :- राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आ. रोहित पवार यांनी पुन्हा एकदा सत्ताधारी महायुती सरकारवर तोफ डागली आहे. थेट शब्दांत फडणवीस, शिंदे आणि अजित पवार यांच्या सरकारवर भ्रष्टाचार, दलाली आणि लुटमारीचे गंभीर आरोप करत त्यांनी म्हटलं आहे की, “हे सरकार घोटाळ्यांनी बरबटलेले आहे. यंत्रणा, न्यायव्यवस्था आणि जनता यांची कोणतीही भीती या निगरगट्ट सरकारला उरलेली नाही.”

रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टमधून स्फोटक शब्दात म्हटलं आहे की, “कोळसाही लाजेल असे काळे कारनामे या सरकारचे आहेत. जेंव्हा या सरकारच्या काळ्या कारनाम्यांची श्वेतपत्रिका निघेल, तेंव्हा महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वात भ्रष्ट सरकार म्हणून याची नोंद होईल.”

त्यांनी पुढे उघडपणे आरोप केला की, “परप्रांतीय दलाल आणि कंत्राटदारांना हाताशी धरून मलिदा खाल्ला जातोय. पुणे, मुंबई, नवी मुंबई आणि गडचिरोली हे या सरकारचे मलिदा खाण्याचे हॉटस्पॉट आहेत. पुण्यात सरकारी जमिनी, मुंबईत SRA च्या जमिनी, नवी मुंबईत वन खात्याच्या जमिनी, तर गडचिरोलीत खाणपट्टे हेच या सरकारचे आवडते खाद्य आहे.”

रोहित पवार इथेच थांबले नाहीत. त्यांनी सत्ताधारी तिन्ही पक्षांना ‘सुलतान मिर्झा’च्या टोळीशी तुलना करत टोला लगावला, “सुलतान मिर्झाने ज्या प्रमाणे मुंबई गुंडांमध्ये वाटली होती, त्याचप्रमाणे भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट यांनी शहरे आणि विभाग आपापसात वाटून घेतले आहेत. एकमेकांचा भ्रष्टाचार झाकत, महाराष्ट्राची लूट सुरू आहे.”

या पोस्टच्या अखेरीस रोहित पवार यांनी सरकारवर जबरदस्त प्रहार करत म्हटलं की, “करून वोटचोरी, सुरूय महाराष्ट्राची लुटमारी!”

सोबतच त्यांनी #गुन्हेगारांना_जामीन_नेत्यांना_जमीन आणि #मलिदा_गँग हे हॅशटॅग वापरून सोशल मीडियावर सत्ताधाऱ्यांना ट्रोल केलं.

राजकीय विश्लेषकांच्या मते, पवार यांची ही पोस्ट केवळ सोशल मीडियावरील प्रतिक्रिया नसून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारविरोधातील जनमत तापवण्याची रणनीती आहे.

दरम्यान, या पोस्टनंतर भाजप आणि शिंदे गटाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली, तरी सत्ताधारी पक्षातील नेत्यांमध्ये खळबळ माजली आहे.

रोहित पवारांच्या या सडेतोड भाषेत लिहिलेल्या हल्ल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा “सत्य विरुद्ध सत्ता” असा संघर्ष उभा राहिला आहे आणि लोकांच्या मनात प्रश्न उमटतोय: खरंच ‘मलिदा गँग’ महाराष्ट्रावर राज्य करत आहे का?



Reactions

Post a Comment

0 Comments