रोहित पवारांचा जयकुमार गोरे यांना थेट चॅलेंज: “आहे का हिंमत? ओपन डिबेटला या!”
पूणे (कटूसत्य वृत्त) :– राजकारणात आरोप-प्रत्यारोप हे नवीन नाहीत, पण राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आ. रोहित पवार यांनी भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर केलेला थेट आणि सडेतोड हल्ला सध्या राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चेत आहे. सोशल मीडियावर पोस्ट करताना रोहित पवार यांनी गोरे यांना आव्हान दिलं.
“जयकुमार गोरे, आपण आधीच ‘उघडे’ पडले आहात, त्यामुळे उघड्या लोकांच्या तोंडून झाकली मूठ अशा गप्पा शोभत नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने ‘भिसे जमीन प्रकरणात’ आणि उच्च न्यायालयाने ‘शोषण प्रकरणात’ आपला जामीन फेटाळताना काय म्हटलं होतं ते पुन्हा आठवून देऊ का? हिंमत असेल तर समोर या ओपन डिबेट करूया! स्थळ, वेळ तुम्ही ठरवा… आहे का हिंमत?”
या एका पोस्टनेच राजकीय वातावरण तापले आहे. पवार यांनी केवळ गोरे यांच्यावर शब्दबाण सोडला नाही, तर थेट सार्वजनिक चर्चेचे खुले आव्हान देऊन संघर्षाची दिशा खुली केली आहे.
राज्य राजकारणात सध्या बारामती ते सातारा या पट्ट्यात पवार विरुद्ध गोरे असा संघर्ष रंगताना दिसतो आहे. जयकुमार गोरे हे पूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेले असून, सत्ताधारी शिबिराचे विश्वासू मानले जातात. दुसरीकडे, रोहित पवार हे विरोधी पक्षातील तरुण आणि थेट बोलणारे नेते म्हणून ओळखले जातात.
या चकमकीनंतर सोशल मीडियावर रोहित पवार समर्थकांचा जल्लोष दिसून आला आहे. अनेकांनी “ओपन डिबेट होऊ दे, कोण सत्य सांगतं ते समोर येईल” अशी मागणी केली आहे.
राजकीय निरीक्षकांचे मत आहे की, “रोहित पवार यांनी गोरे यांच्यावर केलेला हल्ला केवळ वैयक्तिक नाही, तर तो महाराष्ट्रातील राजकीय संस्कृतीतील ‘भाजप विरुद्ध राष्ट्रवादी’ संघर्षाचे प्रतीक बनत आहे.”
सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आ. रोहित पवार यांचे जमीन घोटाळे उघडे करू का? अशी धमकी दिली होती. गोरेंच्या धमकीला पवारांनी प्रती आव्हानच दिले आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.राज्याच्या राजकारणात “रोहित पवार विरुद्ध जयकुमार गोरे” हा नवा राजकीय राऊंड रंगला आहे, आणि त्याची ठिणगी सोशल मीडियावरून थेट लोकांपर्यंत पोहोचली आहे.
0 Comments