कॉलेजला, ४.५० लाख फी घेता ! अनं ऊसाला ३ हजारच देता! शेट्टींचा विखेपाटलांना टोला
पुणे (कटूसत्य वृत्त) :- शेतकऱ्यांविषयी केलेल्या “कर्जबाजारी व्हायचं आणि कर्जमाफी मागायची” या राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वक्तव्याने शेतकऱ्यांचा संताप प्रचंड उफाळला आहे. या वक्तव्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी अक्षरशः तुफान हल्ला चढवला असून, “विखे पाटील, तुमच्या कॉलेजच्या फीप्रमाणे ऊसाचा दर वाढवला असता, तर आज ऊस ३० हजाराचा झाला असता!” असा स्फोटक प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
शेट्टींचा हा हल्ला केवळ वक्तव्य नाही, तो भाजप सरकारला झोंबणारा शेतकऱ्यांचा क्रोध आहे.
ते म्हणाले, “१९८० साली शरद जोशींनी ऊसाला ३०० रुपये दर मिळावा म्हणून आंदोलन केलं होतं. त्या वेळी विखे पाटील यांच्या वडिलांच्या कॉलेजची फी होती फक्त ४,५०० रुपये. आणि आज तुम्हीच ते कॉलेज चालवत आहात, फी झाली ४.५० लाख! पण ऊस मात्र अजूनही ३ हजारच! हे सरकार आणि हे उद्योगपती दोघेही शेतकऱ्यांचा घाम पिऊन सोनं घडवत आहेत.”
शेट्टी भाजपवर थेट हल्ला चढविताना म्हाणाले, “अदानींना पामतेल आयात परवानगी देऊन सोयाबीनचा बाजार उद्ध्वस्त केला, कांद्यावर निर्यातबंदी लावून लाखो शेतकऱ्यांना रडवलं, हमीभावाचा कायदा केला नाही, पिकविमा कंपन्यांना हजारो कोटींचं गिफ्ट दिलं आणि शेतकऱ्याला शून्य! हा सरकारचा ‘खासगी नफा सार्वजनिक नुकसान’ मॉडेल आहे!”
ते पुढे म्हणाले, “महापुरात नुकसान झालं तरी भरपाई नाही, अतिवृष्टी झाली तरी मदत नाही. उलट कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याला आरोपी ठरवून जेलमध्ये टाकता! हा सरकारचा बेशरम चेहरा आहे, शेतकऱ्याच्या घामावर सत्तेचं राजमहल उभं करणाऱ्या लोकांचा.”
राजू शेट्टींची ही पोस्ट सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हजारो शेअर्स, हजारो कमेंट्स आणि एकच सूर : “आता पुरे! शेतकऱ्याची थट्टा थांबवा.” राजकीय वर्तुळातही खळबळ.
विरोधकांनीही याला तात्काळ हाताशी धरत भाजपला घेरायला सुरुवात केली आहे. एक काँग्रेस नेते म्हणाले, “शेट्टींचं बोलणं म्हणजे शेतकऱ्यांच्या मनातल्या जखमा शब्दात उतरल्यासारखं आहे.”राजकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, शेट्टींची ही भूमिका आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसाठी नुसतीच डोकेदुखी नाही, तर ग्रामीण महाराष्ट्रात आगीचा ठिणगी ठरू शकते.
शेवटी शेट्टी म्हणाले की, “सरकार शेतकऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात टाकतंय, पण खरी गुन्हेगार मंडळी सत्तेच्या राजसिंहासनावर बसली आहेत!"
0 Comments