सायरा मुल्ला यांच्या उमेदवारीला मिळतोय वाढता पाठिंबा
राष्ट्रीय काँग्रेस कडून उमेदवारी मिळण्याची शक्यता

बार्शी (कटूसत्य वृत्त):- उच्चशिक्षित पदवीधर असलेल्या सायरा मुल्ला यांनी समाजकार्य क्षेत्रातील एम एस डब्लु तसेच पत्रकारितेचे बी.जे.चे शिक्षण घेतले आहे. आज पर्यंत त्यांनी गुलिस्तान ए हिंद महिला विकास संस्था,मुल्ला मुलाणी बलुतेदार संघटना बार्शी,पोलीस दक्षता समिती सदस्य,श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ तक्रार निवारण समिती सदस्य,वृक्ष संवर्धन समिती महिला अध्यक्ष ,ओन्ली समाज सेवा महिला अध्यक्ष अशा सामाजिक संघटनेत कार्य करून स्वतःचा ठसा उमटवला आहे. महिला समाजसेविका म्हणून त्या संपूर्ण बार्शी शहराला परिचित आहेत.
2009पासून त्यांनी समाजकार्यात सक्रिय राहून बचत गट स्थापन करणे बचत गटांतर्गत कर्ज वाटप करणे, बचत गटांना व्यवसायिक प्रशिक्षण देणे बचत गटांच्या निर्मिती वस्तूंचे स्टॉल लावून विक्री करणे,महिलांना अंगणवाडी प्रशिक्षण देणे,महिलांसाठी मार्गदर्शन व समुपदेशन अंतर्गत महिलांचे प्रश्न सोडवणे इत्यादी कामे करून जन माणसात एक वलय निर्माण केले आहे. सध्या बार्शी नगरपालिकेची निवडणूक लागली आहे. नगराध्यक्ष पद हे सर्व साधारण महिलेसाठी राखीव आहे. या पदासाठी सध्या भाजपा आणि शिवसेना उबाठा आघाडी तर्फे प्रस्थापितांच्या घरच्यांची नावे चर्चेत आहेत. अशातच राष्ट्रीय काँग्रेस तर्फे सायरा मुल्ला यांची उमेदवारी समोर येत आहे. राष्ट्रीय काँग्रेस खरेच सायरा मुल्ला यांना उमेदवारी देईल की नाही हे येणारा काळ ठरवेल परंतु अनेक वर्षापासून सामाजिक कार्यातून जनतेतून आलेला एक सर्वसामान्य चेहरा बार्शी शहराचा नगराध्यक्ष म्हणून पुढे यायला काय हरकत आहे? असा सवाल आता जनता करीत आहे.
0 Comments