बार्शी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 : रणधुमाळीला सुरुवात!
चौथ्या दिवशी नगरसेवक पदासाठी भाजपचा पहिला उमेदवारी अर्ज दाखल!

बार्शी,(कटूसत्य वृत्त):- बार्शी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 ला आता खऱ्या अर्थाने रणधुमाळीची सुरुवात झाली आहे. सोमवारपासून नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली होती, मात्र पहिल्या तीन दिवसांत कोणत्याही उमेदवाराने अर्ज दाखल केला नव्हता. अखेर चौथ्या दिवशी गुरुवारी भारतीय जनता पार्टीच्या वतीने पहिला अर्ज दाखल होताच निवडणुकीच्या वातावरणाला चांगलीच रंगत येत आहे.
भाजपकडून रोहित रमेश पाटील यांनी प्रभाग क्र. 18 (अ) मधून ओबीसी पुरुष प्रवर्गातून आपल्या उमेदवारीचा नामनिर्देशन अर्ज दाखल करत या निवडणूक लढतीचा शुभारंभ केला आहे. अवघ्या 24 वर्षांचा हा तरुण उमेदवार, कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय असलेला आणि युवकांमध्ये प्रभावी संघटन उभं करणारा चेहरा म्हणून ओळखला जातो.
रोहित पाटील हे माजी नगराध्यक्ष रमेश पाटील यांचे सुपुत्र असून त्यांच्या कुटुंबाचा बार्शी नगरपरिषदेतील राजकीय वारसा तीन पिढ्यांपासून सुरू आहे. भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी आमदार राजेंद्र राऊत यांचे ते विश्वासू समर्थक मानले जातात. त्यांच्या वडिलोपार्जित सामाजिक आणि राजकीय परंपरेचा वारसा पुढे नेत, रोहित पाटील यांनी युवकांच्या माध्यमातून संघटनात्मक कामगिरी उभी केली आहे. त्यांच्या नम्र स्वभावामुळे, मदतीच्या वृत्तीमुळे आणि सामाजिक कार्यातील सक्रिय सहभागामुळे त्यांना स्थानिक स्तरावर मोठा जनाधार मिळाल्याचे पक्ष कार्यकर्ते सांगतात. “तरुण नेतृत्वावर जनतेचा विश्वास आहे, आणि आम्ही निश्चितच प्रचंड मताधिक्याने विजयी होऊ,” असा विश्वास रोहित पाटील यांनी नामनिर्देशनानंतर व्यक्त केला.
अर्ज दाखल करताना भाजपचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये विजय राऊत, रमेश पाटील, भारत पवार, प्रकाश मोहिते, पी. एम. मनगिरे, संभाजी पाटील, दिगंबर चिंतामणी, विजय पवार, बप्पा मोटे, अजय पाटील, सूर्यकांत देशमुख, पाचू उघडे, रोहित लाकाळ, महादेव देशमुख, संग्राम मोहिते, पप्पू माने यांच्यासह असंख्य युवकांचा उत्साह लक्षणीय होता. कार्यकर्त्यांनी “बार्शीकरांचा विकास म्हणजे भाजपचा निर्धार” अशी घोषणा देत उमेदवाराचे स्वागत केले.
बार्शी नगरपरिषदेच्या निवडणुकीत आतापर्यंत उमेदवारांनी नावनोंदणी प्रक्रियेत थोडीशी शांतता ठेवली होती. मात्र भाजपचा पहिला अर्ज दाखल झाल्यानंतर आता इतर पक्ष आणि अपक्ष इच्छुकांची हालचाल वाढण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत इतर पक्ष आणि अपक्ष गटांकडूनही उमेदवारी अर्ज दाखल होणार असल्याने निवडणुकीचे वातावरण अधिकच तापण्याचे संकेत आहेत. तसेच बार्शी शहराच्या राजकारणात भाजपकडून दाखल झालेल्या पहिल्या अर्जाने “शुभारंभ झाला आहे”, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. आता सर्वांच्या नजरा येत्या काही दिवसांत कोण-कोण आपले अर्ज दाखल करतात याकडे लागल्या आहेत.
0 Comments