देशविरोधी कृत्य करणाऱ्या RSS वर कायमस्वरूपी
बंदी घाला - कांबळे यांची तीव्र मागणी
करमाळा (कटूसत्य वृत्त):- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) या संघटनेवर देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप करत, त्या संघटनेवर कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी भीम आर्मी संविधान रक्षक दलाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांनी केली आहे.
करमाळ्यात माध्यमांशी बोलताना कांबळे म्हणाले की, “महात्मा गांधींच्या हत्येत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सहभाग होता. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात संघाचे योगदान शून्य आहे. उलट देशात जातीय आणि धार्मिक द्वेषाचे वातावरण निर्माण करण्याचे काम या संघटनेने केले आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
ते पुढे म्हणाले की, “संघाचे स्वयंसेवक वारंवार देशाच्या संविधानाचा आणि राष्ट्रध्वजाचा अवमान करत आले आहेत. गोहत्येच्या नावाखाली सर्वसामान्य शेतकरी आणि शेतमजुरांवर अत्याचार केले जात आहेत. महाराष्ट्रातील मालेगाव, पूर्णा, नांदेड, परभणी आदी ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटांमध्येही संघाशी संबंधित व्यक्तींवर गुन्हे दाखल आहेत.”
कांबळे यांनी आरोप केला की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे धर्मादाय विभागाकडे नोंदणीच नाही, त्यामुळे संघाकडे बेहिशोबी मालमत्ता साठवलेली आहे. याशिवाय, “संघाचे काही स्वयंसेवक पाकिस्तानला गुप्त माहिती पुरवत असल्याचे प्रदीप कुरुळकर प्रकरणातून स्पष्ट झाले आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.
इतकेच नव्हे तर कांबळे यांनी ऐतिहासिक संदर्भ देत सांगितले की, “देशविघातक कृत्यांमुळेच 1947, 1948, 1975 आणि 1992 या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्यात आली होती. आता पुन्हा तीच वेळ आली आहे. त्यामुळे संघावर तातडीने आणि कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी,” अशी मागणी त्यांनी जोरदार शब्दांत केली.

0 Comments