बालाजी अमाईन्स लिमिटेडला ‘रोटरी इंडिया नॅशनल CSR अवॉर्ड’
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- रोटरी इंडियाच्या वतीने देशभरातील उद्योगसमूहांच्या सामाजिक जबाबदारीतील (CSR) उल्लेखनीय योगदानाची दखल घेत रोटरी इंडिया नॅशनल CSR अवॉर्ड २०२५ जाहीर करण्यात आले. या प्रतिष्ठित पुरस्कारांमध्ये बालाजी अमाईन्स लिमिटेडने पश्चिम विभागातील मोठ्या उद्योगसमूह (Large Scale Enterprise) या गटात आरोग्य क्षेत्रासाठी (Healthcare) सर्वोत्तम CSR कार्याचा पुरस्कार पटकावला आहे.
हा पुरस्कार कंपनीचे महाव्यवस्थापक (वित्त) अरुण मासाळ यांनी स्वीकारला. पुरस्कार वितरण समारंभ मोतिलाल ओसवाल टॉवर, प्रभादेवी, मुंबई येथे ८ ऑक्टोबर २०२५ रोजी पार पडला. या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी मोतिलाल ओसवाल तर विशेष अतिथी अभिनेता व समाजसेवक सोनू सूद होते.
बालाजी अमाईन्स लिमिटेड ही सोलापूरातील अलिफॅटिक अमाईन्स आणि स्पेशालिटी केमिकल्स निर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असून, व्यावसायिक यशासोबतच कंपनीने सामाजिक जबाबदारीच्या क्षेत्रात विशेषत: आरोग्य सेवेच्या उन्नतीसाठी उल्लेखनीय योगदान दिले आहे.
कोविड काळापासून कंपनी सातत्याने आरोग्यसेवेच्या बळकटीसाठी काम करत असून, सोलापूर शहरात तीन रुग्णालयांचे नूतनीकरण केले आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी विनामूल्य किंवा अत्यल्प किंमतीत सेवा या रुग्णालयांच्या माध्यमातून गरजुंना मिळत आहे. या रुग्णालयांमध्ये आता अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून त्या कोणत्याही कॉर्पोरेट रुग्णालयांच्या तोडीस तोड आहेत.
या प्रसंगी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डी. राम रेड्डी यांनी सांगितले की,
“कंपन्यांवर CSRची जबाबदारी लागू होण्यापूर्वीच, आमच्या व्यवस्थापनाने १९९० च्या दशकापासून बालाजी फाउंडेशनच्या माध्यमातून समाजसेवा सुरू केली होती. आरोग्य, शिक्षण आणि क्रीडा या क्षेत्रांमध्ये आम्ही सतत कार्यरत आहोत. आमचे चेअरमन ए. प्रताप रेड्डी म्हणतात कि आपण समाजाच्या ऋणात आहोत, ज्या समाजाने आपल्याला खूप काही दिले, ते परत द्यावे हीच खरी सामाजिक जबाबदारी आहे. आज रोटरी इंडियाकडून हा सन्मान मिळाल्याचा आम्हाला अभिमान आणि आनंद वाटतो."
हा पुरस्कार बालाजी अमाईन्स लिमिटेडच्या समाजाभिमुख दृष्टीकोनाचा आणि दीर्घकालीन सामाजिक बांधिलकीचा गौरव असून, कंपनीने आरोग्य, शिक्षण आणि समाजकल्याण या क्षेत्रांमध्ये उभारलेले कार्य इतरांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.
0 Comments