महापुराचं पाणी ओसरलं, पण शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू नाहीत; दिवाळीपूर्वी मदतीचं काय?
सोलापूर (सचिन जाधव):- गेल्या आठवड्याभरात मुसळधार पावसामुळे सोलापूर जिल्ह्यात निर्माण झालेली पूरस्थिती आता हळूहळू निवळू लागली आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात कुठेही मोठा पाऊस न झाल्याने सीना आणि भीमा या दोन्ही नद्यांची पाणीपातळी खाली येऊ लागली असून, बाधित भागांतील जनजीवन पूर्ववत होण्यास सुरुवात झाली आहे.
भीमा, सीना आणि इतर प्रमुख नद्यांमधील पाणी ओसरण्याच्या स्थितीत आहे. पण अनेक भागात पूरस्थिती कायम आणि नियंत्रणात आहे. विशेषतः नदीकाठच्या माढा, उत्तर सोलापूर, मोहोळ, बार्शी या तालुक्यातील काही गावात अजूनही पाणी साचलेले आहे आणि स्वच्छतेचे काम सुरू आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत सुमारे ४००० हजाराहून अधिक नागरिकांना या आधीच सुरक्षितस्थळी हलविण्यात आले होते. पण पाणी ओसरू लागल्याने तेही आता आपल्या घराकडे परंतु लागले आहेत.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकांसह महसूल, जिल्हा परिषद आदी विभागाकडून मदतकार्य वेगाने सुरू आहे. सोलापूर शहर व ग्रामीण भागात वीज आणि पाणीपुरवठा पुन्हा सुरळीत करण्याचे प्रयत्नही सुरू आहेत.
सीना, भीमेतील विसर्ग घटला
मागच्या आठवड्यात सीना नदीतील विसर्ग तब्बल सव्वादोन लाख क्युसेकपर्यंत गेला होता. तर भीमा नदीतील विसर्गही १ लाख ३५ हजार क्युसेकवर होता. त्यामुळे महापुराचा धोका निर्माण झाला. पण दोन दिवसांपासून या दोन्ही नद्यांच्या विसर्गात घट झाल्याने पाणी पातळी नियंत्रणात आहे.
उजनी धरणातून भीमा नदीत बुधवारी २५ हजार क्युसेक तर सीना नदीत २४ हजार ७०० क्युसेक एवढाच विसर्ग सोडण्यात येत होता. उद्यापर्यंत त्यात आणखी घट होईल आणि परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात येईल, अशी स्थिती आहे.
माढा तालुक्यातील सीना नदीला आलेल्या भीषण महापुरामुळे २० गावांतील शेकडो कुटुंबांचं जीवन उध्वस्त झालं आहे. गेल्या १६ दिवसांपासून महापुराशी संघर्ष करणाऱ्या शेतकरी आणि ग्रामस्थांचा संघर्ष आता पाण्याशी नसून उदरनिर्वाहाच्या मूलभूत गरजांशी सुरू झाला आहे. पुराचं पाणी ओसरलं असलं तरी शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू अजूनही आटलेले नाहीत.
सरकारकडून दिवाळीपूर्वी मदत मिळेल, अशी ग्वाही दिली जात असली तरी प्रत्यक्षात शासकीय यंत्रणेचा धीम्या गतीने सुरू असलेला पंचनाम्यांचा कामकाज, आणि ॲग्रीस्टॅक ओळख क्रमांकाची अट, यामुळे अनेक शेतकऱ्यांना अद्यापही मदतीच्या प्रतिक्षेत राहावं लागणार आहे.
पूर ओसरला पण संकट नाही
सीना नदीच्या पुरामुळे बाधित झालेल्या गावांतील नागरिक आता आपल्या गावांकडे परतू लागले आहेत. निवाराकेंद्रात आश्रय घेतलेल्या नागरिकांची संख्या कमी होत असली तरी शेतात अजूनही चिखल आणि साचलेलं पाणी असल्याने शेतीकाम ठप्प झालं आहे. अनेक ठिकाणी शेतांचे बांधही ओळखू येत नाहीत.
सामाजिक संस्था आणि स्थानिक मदतीला धावल्या
पूरग्रस्त भागात राज्यभरातून सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था आणि राजकीय पक्षांकडून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. कपडे, साड्या, अन्नधान्य, उबदार कपड्यांसह जनावरांच्या चार्याचीही काही प्रमाणात व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र रोख स्वरूपातील मदतीची वाट अद्याप सुरू झालेली नाही.
आरोग्य समस्यांचं वाढतं सावट
पुराचा फटका बसलेल्या अनेक कुटुंबांतील महिला व लहान मुलांमध्ये आता आरोग्याच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत. शासकीय रुग्णालयांसह खासगी डॉक्टरांकडेही गर्दी वाढली आहे. दूषित पाणी आणि अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.
पंचनाम्यांची धीमी गती; दिवाळीपूर्वी मदत मिळणार का?
राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे सुरू झाले आहेत. मात्र सोलापूर, बीड, नांदेड, अहिल्यानगरसारख्या जिल्ह्यांत अद्यापही काही भागांत शेतांमध्ये पाणी साचलेले असल्याने पंचनाम्यांच्या कामाला सुरुवातही झालेली नाही. सोलापूर जिल्ह्यात तब्बल ३.९८ लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांचं नुकसान झालं आहे.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ ऑक्टोबरपर्यंत पंचनाम्यांचा अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठवण्यात येईल. त्यानंतर शासन निर्णय जाहीर होऊन शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम जमा होईल. त्यामुळे मदतीचा मुहूर्त दिवाळीनंतरच उजाडण्याची शक्यता आहे.
ॲग्रीस्टॅकचा अडसर; काही शेतकरी मदतीपासून वंचित?
कृषी विभागाच्या नव्या ॲग्रीस्टॅक योजनेनुसार, शेतकऱ्यांच्या ओळख क्रमांकावर आधारित मदत देण्यात येणार आहे. त्यामुळे या योजनेत नोंद नसलेल्या किंवा ओळख क्रमांक नसलेल्या शेतकऱ्यांना शासन मदतीपासून वंचित राहावं लागणार का? हा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. शासनाने यावर तत्काळ स्पष्टता द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून होत आहे.
६६ लाख हेक्टरवर नुकसान; राज्यात भीषण स्थिती
संपूर्ण महाराष्ट्रात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत एकूण ६६.५६ लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. फक्त सप्टेंबर महिन्यातच ३९.३४ लाख हेक्टर क्षेत्रावर अतिवृष्टी आणि पुरामुळे हानी झाली आहे. बीड, अहिल्यानगर, संभाजीनगर, सोलापूर आणि जालना या जिल्ह्यांत सर्वाधिक नुकसान झालं आहे.
दिवाळीपूर्वी मदतीची घोषणा; अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी *"दिवाळीपूर्वी मदतीचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाईल"* अशी घोषणा केली आहे. मात्र प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही प्रक्रिया १५ ऑक्टोबरनंतरच पूर्ण होणार असल्याने दिवाळीपूर्वी मदत मिळेलच, याची खात्री नाही.
शेतकऱ्यांच्या आशा अधांतरी
शासनाच्या आश्वासनांवर आजवर वेळोवेळी विश्वास ठेवलेल्या शेतकऱ्यांची दिवाळीपूर्वी मदतीसाठी पुन्हा एकदा प्रतीक्षा सुरू आहे. मात्र आश्वासनं पुन्हा एकदा फसवणार नाहीत ना, ही भीती त्यांच्या मनात आहे.
0 Comments