Hot Posts

6/recent/ticker-posts

वाहतूक कोंडीने सोलापूर शहरातील रस्ते जाम!

 वाहतूक कोंडीने सोलापूर शहरातील रस्ते जाम!




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहरात वाहतूक पोलिसांचे दक्षिण व उत्तर असे दोन विभाग आहेत. वाहतूक नियमन सुरळीत रहावे, रस्त्यांवर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून ठिकठिकाणी अंमलदार नेमले जातात.  मात्र, ज्या ठिकाणी नियमित वाहतूक कोंडी होते, तेथे एकही अंमलदार नसतो. रस्त्यांलगत उभ्या वाहनांमुळे सोलापूर शहरातील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस तीव्र होऊ लागल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

सोलापूर शहरातील प्रवासी रिक्षांची संख्या सध्या ३५ हजारांवर पोचली आहे. ग्रामीणचे परमीट असलेल्या रिक्षा शहरातील रस्त्यांवरून धावतात. प्रवाशांची ने-आण करणाऱ्या शेकडो रिक्षा अनफिट आहेत. रिक्षांसाठी ठिकठिकाणी थांबे निश्चित करून दिले आहेत. तरीदेखील प्रवासी ज्याठिकाणी दिसेल तेथे अचानक थांबण्याचा गंभीर प्रकार शहरात सुरू आहे. दुचाकीस्वार, कारचालक रस्त्यांलगत वाहने उभी करून इतरत्र जातात. त्यात रिक्षांची गर्दी, वाहनांची वाढलेली संख्या आणि वाहतूक अंमलदार नसल्याने सोलापूर शहरातील मुख्य एसटी स्टॅण्ड ते नवीवेस पोलिस चौकी, या रस्त्यावर मुंबई-पुण्यात असल्याचा अनुभव वाहनधारकांना येऊ लागला आहे. मंगळवार बाजार-टिळक चौक- कन्ना चौक आणि सराफ बाजार परिसर, जिल्हा परिषद ते बेगम पेठ या रस्त्यांवरही अशीच स्थिती आहे.

छत्रपती शिवाजी महाराज चौक, टिळक चौक, नवीवेस पोलिस चौकीसमोर, नवीपेठ, बेगम पेठ, जिल्हा परिषदेजवळील पूनमगेट, सराफ बाजार, रंगभवन चौक ते सिव्हिल चौक, सिव्हिल चौकातून जेलरोड पोलिस ठाण्याकडे जाणारा रस्ता, रेल्वे स्टेशनसमोर, आसरा चौक, आसरा पूल उतरून डी-मार्टकडे जाताना, धर्मवीर संभाजी तलावापासून पुढे शासकीय आयटीआयपर्यंतचा रस्ता, याठिकाणी नेहमीच वाहतूक कोंडी होत आहे.

शहरातील मुख्य एसटी स्टॅण्डसमोरील हातगाडे, प्रवाशांची वाट पहात थांबलेली वाहने आणि एका लेनवर उभारलेल्या शहरातील रिक्षांमुळे छत्रपती शिवाजी महाराज चौकात नेहमीच वाहतूक कोंडी होत होती. पण, आता एसटी स्टॅण्डमधून बाहेर पडणाऱ्या बसगाड्या चौकाला वळसा घालून जात असल्याने सकाळ, दुपार, सायंकाळ अशा तिन्ही सत्रात तेथे वाहतूक कोंडी होत आहे. अक्षरशः पादचाऱ्यांना ये-जा करायला सुद्धा रस्ता शिल्लक नसतो.
Reactions

Post a Comment

0 Comments