Hot Posts

6/recent/ticker-posts

२ तारखेला सोलापूर शहरातील वाहतूक मार्गात बदल

 २ तारखेला सोलापूर शहरातील वाहतूक मार्गात बदल





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शहरात विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त २ ऑक्टोबरला मिरवणुका काढल्या जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्या दिवशी सकाळी सहापासून मिरवणूक संपेपर्यंत रमाबाई आंबेडकर नगर-डॉ. आंबेडकर उद्यान, सम्राट चौक, मिलिंद नगर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मेकॅनिक चौक, सरस्वती चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, जुना एम्प्लॉयमेंट चौक ते बुद्ध विहार फॉरेस्ट आणि फडकुले सभागृह ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा हे दोन्ही मार्ग वाहतुकीसाठी बंद असणार आहेत.

शहरातून २ ऑक्टोबर रोजी निघणाऱ्या मिरवणुकांमुळे जे रस्ते बंद करण्यात आले आहेत, त्या मार्गांवरील वाहनांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विजयपूरकडून पुणे किंवा हैदराबादकडे जाणाऱ्या वाहनांसाठी नवीन विजापूर नाका, नवीन बायपासमार्गे केगाव ब्रिज ते पुढे जाता येईल. हैदराबादकडून पुणे किंवा विजयपूरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी नवीन हैदराबाद नाका, जुना हैदराबाद नाका, मार्केट यार्ड, जुना पुना नाका, केगाव बायपासमार्गे पुढे जाता येईल. रेल्वे स्टेशनकडून एसटी स्टॅण्डकडे जाणाऱ्या वाहनांना लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौकातून कल्पना कॉर्नर, डीटीएम चौक, जुना हिरज नाका, निराळे वस्ती, हॉटेल ॲम्बेसेडर ते एसटी स्टॅण्ड हा मार्ग वापरता येईल.

सोलापूर व जुळे सोलापुरातून शहरात येणाऱ्या वाहनचालकांना जुना पुना नाका, जुना तुळजापूर नाका, जुना बोरामणी नाका, अशोक चौकमार्गे शहरात आणि जड वाहनांसाठी मार्केट यार्ड चौक, जुना बोरामणी नाका, शांती चौक ते अक्कलकोट रोड असा मार्ग उपलब्ध असल्याचे आदेश पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी काढले आहेत.

मिरवणुकीत 'डीजे'ला परवानगी नाहीच

सोलापूर शहर हद्दीत २ ऑक्टोबर रोजी सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाकडून आणि धम्मचक्र प्रवर्तन मंडळाकडून मिरवणुका काढल्या जाणार आहेत. यावेळी डीजे सिस्टीम वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता- २०२३ चे कलम १६३(१) नुसार हे निर्बंध घालण्यात आले आहेत. यासंदर्भात ज्येष्ठ नागरिक व डॉक्टर्स यांच्यासह अनेक सामाजिक संघटनांनी निवेदने दिली आहेत. आदेशाचा भंग केल्यास भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २२३ नुसार कारवाई केली जाणार आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments