राज्यातील दीड कोटी एकर शेतीचे नुकसान; शेतकरी रडतोय, सरकार फक्त आश्वासनं देतंय !
सरकारला आरसा दाखवणारे प्रश्न
- ५२ लाख हेक्टर शेती पाण्यात गेली, तरी १० हजार रुपयांत शेतकरी पुन्हा उभा राहणार का?
- पंचनाम्यांच्या नावाखाली किती वेळा शेतकऱ्यांची फसवणूक होणार?
- सरसकट कर्जमाफी कधी होणार?
मुंबई (कटूसत्य वृत्त):- अतिवृष्टीने राज्यातील शेतकऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. खरीप हंगामाचा बोजवारा उडाला, घरे वाहून गेली, जनावरांसाठी चारापाणी नाही आणि शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर आला आहे. मात्र सरकारकडून नेहमीसारखी "पंचनामे होतील, मदत मिळेल" अशी घोषणांची बडबड सुरू आहे.
कृषीमंत्री दत्तात्रय भरणे सांगतात, राज्यातील सव्वा ते दीड कोटी एकर शेतीचे नुकसान झाले आहे. नांदेड, अहिल्यानगर, बीड, जालना, सोलापूर, धाराशिव, यवतमाळ हे जिल्हे सर्वाधिक उद्ध्वस्त झाले आहेत. ५२ लाख हेक्टरवरील पिके पाण्यात गेली आहेत. शेतकरी हवालदिल आहे, पण सरकार अजूनही "निकष" आणि "केंद्राच्या मदतीची वाट" बघतंय.
आकडे गगनाला भिडले, पण मदत मात्र तुटपुंजी
जून-जुलैमध्ये थोडं नुकसान झालं, पण ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये चित्र भयावह झालं.
सप्टेंबरमध्ये २६ लाख हेक्टर शेती उद्ध्वस्त; बीड आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत प्रत्येकी साडेपाच लाख हेक्टरवर हानी.
जालना, सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्येही लाखो हेक्टर शेती पाण्याखाली.
तरी सरकार म्हणतं, "दहा दिवसांत पंचनामे होतील आणि १० हजार रुपये शेतकऱ्यांच्या हाती येतील."
१० हजार रुपयांत शेतकरी काय करणार? शेती पुन्हा उभी करणार की जनावरं पाळणार? की घराचा उद्ध्वस्त झालेला संसार उभा करणार?
सरसकट कर्जमाफीवर मौन
शेतकऱ्यांच्या तोंडचा घास वाहून गेला, कर्जाचे ओझे डोक्यावर आहे. सरकारच्या प्रत्येक नेत्याच्या तोंडून "कर्जमाफी करण्याबाबत कुणाचे दुमत नाही"असा गोडवा ऐकायला मिळतो, पण निर्णय मात्र अद्याप हवेतच लटकतोय. मुख्यमंत्री–उपमुख्यमंत्र्यांच् या मान्यतेशिवाय काही होणार नाही, अशी चिरपरिचित सबब शेतकऱ्यांना पुन्हा एकदा खायला घातली जातेय.
शेतकऱ्याच्या पायाखालची जमीन वाहून गेली, पण सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची जमीन अजून का हलत नाही? हेच आजचं सर्वात मोठं आणि कडवट सत्य आहे.
0 Comments