शेटफळमध्ये राजकीय हालचालींना वेग; अनपेक्षित भेटीमुळे चर्चांना उधाण
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- शेटफळ (ता. मोहोळ) येथे झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीमुळे स्थानिक राजकारणात नव्या हालचालींना वेग आला आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटबांधणी आणि नव्या समीकरणांची चुणूक दिसू लागली आहे.
ज्येष्ठ नेते मनोहर डोंगरे यांच्या निवासस्थानी आज झालेल्या या बैठकीत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम (काका) साठे, ज्येष्ठ नेते दीपक गायकवाड, माजी उपसभापती मानाजी माने यांची उपस्थिती होती. याचबरोबर माजी आमदार राजन पाटील गटाशी संबंधित कार्यकर्ते आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नागेश साठे यांच्या अनपेक्षित उपस्थितीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
या बैठकीनंतर शेटफळ परिसरात “नवे राजकीय समीकरण तयार होत आहे का?” हा प्रश्न सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. जिल्हा परिषद निवडणुकांच्या तोंडावर या नेत्यांच्या भेटीमुळे स्थानिक राजकारणात उत्सुकता निर्माण झाली असून पुढील काही दिवसांत या हालचालींना कोणता कल प्राप्त होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0 Comments