टेंभुर्णी बाजार समितीच्या गाळ्यामध्ये दुर्गंधी व पाण्याचा साम्राज्य ,गाळेधारकांचा संताप, “स्वच्छता करा अन्यथा पैसे परत द्या” : बाळासाहेब ढवळे
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- कुर्डूवाडी/टेंभुर्णी :कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (APMC) कुर्डूवाडी आणि उपबाजार टेंभुर्णी येथील अनागोंदी कारभारावर व्यापाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. टेंभुर्णी येथील व्यापारी संकुलाच्या तळमजल्यावर साचलेल्या पाण्यामुळे परिसर ‘पाझर तलावाचे’ स्वरूप धारण करून दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. गवत, कचरा आणि चिखलाने परिसर अस्वच्छ झाल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत असून, त्यांनी भरलेली डिपॉझिट रक्कम परत करण्याची मागणी केली आहे.
टेंभुर्णी येथील गाळेधारकांनी बाजार समितीकडे सुमारे आठ लाख रुपये डिपॉझिट भरले असतानाही, मूलभूत सुविधा न मिळाल्याने व्यापारी त्रस्त झाले आहेत. तळमजल्यावर गुडघाभर साचलेले पाणी गेल्या पंधरा दिवसांपासून तसेच असून, तीव्र दुर्गंधीमुळे व्यवहार करणे अशक्य झाले आहे.
बाजार समितीच्या दुय्यम बाजार आवारात शौचालय आणि मुतारीच्या सुविधांचा पूर्णतः अभाव आहे. त्यामुळे महिला व्यापारी व ग्राहकांना मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे. या परिस्थितीमुळे बाजार समितीच्या भोंगळ कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
व्यापाऱ्यांच्या मते, बाजार समितीने मनमानी पद्धतीने बांधकाम करून मोठ्या प्रमाणात पैसे उकळण्याचा प्रकार सुरू आहे. मात्र, व्यापाऱ्यांच्या मूलभूत गरजांकडे संपूर्ण दुर्लक्ष करण्यात आले आहे. एवढेच नव्हे, तर अनेक खाजगी पतसंस्था, बँका व कार्यालयांना जागा देऊन नियमबाह्य कारभार केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
विठ्ठल शिंदे साखर कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब (तात्या) ढवळे यांनी सांगितले की, “आम्ही आठ लाख रुपये देऊन गाळा घेतला, पण कोणतीही सुविधा नाही. माझ्या गळ्यासमोर चार ते पाच फूट पाणी साचले आहे. पंधरा दिवस झाले तरी मार्केट कमिटीने काहीच केले नाही. जर तात्काळ स्वच्छता केली नाही, तर आम्ही पैसे परत मागण्याचा निर्णय घेऊ,” असा इशारा त्यांनी दिला आहे.
बाजार समितीच्या कारभारावर व्यापाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, पणन व सहकार विभागाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक व्यापारी व नागरिकांनी केली आहे.
0 Comments