नवरात्र उत्सवात डॉल्बी, डि.जे. व लेझर लाईट वापरास बंदी – जिल्हाधिकारी आशीर्वाद
सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्यात दिनांक २२ सप्टेंबर २०२५ ते ०७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत पारंपरिक पद्धतीने व उत्साहात साजरा होणाऱ्या नवरात्र उत्सवाच्या मिरवणुकांमध्ये डॉल्बी, डि.जे. सिस्टीम व लेझर लाईट शोच्या वापरास प्रतिबंध घालण्यात आला आहे. जिल्ह्याचे जिल्हादंडाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३(१) अन्वये हा आदेश जारी केला आहे.
मागील वर्षी सार्वजनिक शक्तीदेवी उत्सव मंडळ व गरबा- दांडिया आयोजक मंडळाकडून आयोजित कार्यक्रमांमध्ये डॉल्बी व डि.जे. सिस्टीममुळे काही भाविकांना कान व छातीच्या त्रासामुळे अपंगत्व किंवा जीवितास धोका निर्माण झाल्याची प्रकरणे निदर्शनास आली होती. तसेच लेझर लाईटमुळे वयोवृद्ध व लहान मुलांच्या डोळ्यांना इजा झाल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
या संदर्भात ज्येष्ठ नागरिक संघटनांनी निवेदन सादर केले असून, उपविभागीय अधिकारी, सोलापूर क्र. १ यांनी दिनांक २० सप्टेंबर २०२५ रोजीचा अहवाल सादर केला आहे. त्यानुसार, सार्वजनिक आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने डॉल्बी, डि.जे. व लेझर लाईटच्या वापरास प्रतिबंध करणे आवश्यक असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
जिल्हादंडाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आपल्या आदेशात नमूद केले आहे की, सार्वजनिक शक्तीदेवी उत्सव मंडळ व गरबा- दांडिया आयोजक मंडळाकडून आयोजित कार्यक्रमांमध्ये व मिरवणुकांमध्ये वरील तंत्रज्ञानाचा वापर पूर्णतः प्रतिबंधित करण्यात येत आहे. हा आदेश सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुके व सार्वजनिक कार्यक्रमांवर लागू राहील.
0 Comments