Hot Posts

6/recent/ticker-posts

राम सातपुते तालुक्यात आले आणी राजकारणाचा खेळ खंडोबा केला- के.के. पाटील

 राम सातपुते तालुक्यात आले आणी राजकारणाचा खेळ खंडोबा केला- के.के. पाटील




अकलूज (कटूसत्य वृत्त):- माळशिरस तालुक्याच्या राजकारणाने एवढी खालची पातळी कधी गाठली नव्हती. राम सातपुते तालुक्यात आले आणी हाताशी गुंड धरून तालुक्याच्या राजकारणाचा खेळ खंडोबा केला. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच बदनामी होऊ लागल्याचा घरचा आहेर भाजपचे जेष्ठ नेते के. के. पाटील यांनी संगम येथील सर्वपक्षीय बैठकीत दिला.

संगम, ता. माळशिरस येथील मंगल कार्यालयात रविवारी तालुक्यातील भाजप बरोबरच समविचारी पक्षांच्या कार्यकर्त्यांची (तिसऱ्या आघाडीची) बैठक पार पडली.
बैठकीसाठी तालुक्यातील भाजपचे राज्य तसेच जिल्हा, तालुका पदाधिकारी त्याच बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस, संभाजी ब्रिगेड, रिपाई, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना शिंदे गट, मनसे, भारतीय दलीत महासंघ, प्रहार, रयत शेतकरी संघटना आदी प्रमुख राजकीय संघटनांचे मुख्य पदाधिकारी अतुल सरतापे, किशोर सुळ, सत्यजित सपकाळ, बाळासाहेब धाईंजे, अजित बोरकर, शहाजी पारसे, दिगंबर मिसाळ, दादा लोखंडे आदी उपस्थित होते.
 
प्रारंभी सागर मिसाळ यांनी प्रास्ताविक केल्यानंतर मुख्य आयोजक भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य महेश इंगळे यांनी स्वागतपर भाषणात म्हणाले की, राम सातपुते प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी तालुक्यातील भाजप संपवायला निघाली आहे. या तालुक्यातील ते वाल्मीक कराड होऊ पहात आहेत. तालुक्यातील अवैध धंदेवाले यांचे कार्यकर्ते असून त्यांना गाडीत घेऊन ते फिरतात. तालुक्यात त्यांनी अराजकता निर्माण केली आहे. आजच्या या कार्यक्रमाला कुणी जाऊ नका म्हणून एवढेच काय कार्यक्रमाला मंगल कार्यालय देऊ नका म्हणून त्यांनी फोन केले आहेत.
   
यावेळी पुढे बोलताना के. के. पाटील म्हणाले की, तालुक्यात भाजप वाढत असताना आमचे नेहमी उमेदवार असणारे उत्तमराव जानकर यांच्या दाखल्यांच्या अडचणी निर्माण व्हायच्या, त्यामुळे मीच श्रीकांत भारतीय यांच्याकडे पाठपुरावा करून राम सातपुते यांना उमेदवार म्हणून आणले. मात्र त्याच वेळी जर जानकर यांना दाखल्याची अडचण आली तरच सातपुते यांनी संधी देण्याचे ठरले होते. मात्र त्यांना आणणे ही माझी चूकच ठरली हे मान्य आहे.
त्यांना मिळालेली १ लाख ८ हजार मते ही तालुक्यातील भाजप व समविचारी पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या कामाची पावती होती. आमच्या पक्षात आधी राष्ट्र, मग पक्ष व त्यानंतर मी हा मंत्र आहे मात्र आता उलटे वाचावे लागत आहे. यांच्या या वागण्याने तालुक्यात असंतोष निर्माण झाला आहे. त्यांनी तालुक्यात चुकीचे वळण लावण्यास सुरुवात केली असून पोलीस, गुंड पाठवणे,  धमक्या देणे, दोन नंबर वाल्यांना घेऊन फिरणे हे या तालुक्यात चालणार नाही. त्यांच्या पायाखालची वाळू सरकु लागल्यानेच त्यांनी लोकांना जाऊ नका म्हणून फोन करणे, मंगल कार्यालय मालकांना फोन करणे, कार्यक्रमात गुंड लोकांना पाठवणे असे प्रकार केले आहेत. त्यांच्या या वागण्यानेच तालुक्यातील सर्वच पक्षांचे मात्र समविचाराचे कार्यकर्ते एकत्र आले आहेत.

 यावेळी ॲड.सोमनाथ वाघमोडे यांनीही गेली ३५ वर्षांपासून आम्ही प्रस्थापितांच्या विरोधात लढत आहोत परंतू ते किंवा आम्हीही कधी एवढ्या खालच्या पातळीवरील राजकारण केले नाही. मात्र गेल्या ५/७ वर्षात बाहेरून येणाऱ्या लोकांनी तालुक्यातील राजकारणाची पातळी बदलली आहे. त्यांनी स्थानिक विरोधकांना बदनाम केले आहे. त्यांनी खोट्या फोनचे नावाने लोकांना धमक्या देण्याचे प्रकार सुरू केले आहेत. ते या तालुक्यात चालणार नाही. म्हणूनच सगळे समविचारी एकत्र आले आहेत.
   
आयोजक महेश इंगळे यांचे भाषण सुरू असताना एका व्यक्तीने इंगळे यांना माझे तुझ्याकडे गेली १३ वर्षांचे पैसे आहेत. ते आताच्या आता दे, म्हणत बोलण्यास अडथळा आणला मात्र काही वेळानंतर व्यासपीठावरील लोकांनी त्यास गोड बोलून बाहेर काढण्यात यशस्वी झाले.त्यामुळे कार्यक्रम थोडावेळ विस्कळीत झाला होता.

 यावेळी विविध पक्षांचे भिमराव भुसनर, अप्पासाहेब कर्चे, राहुल ढेरे, सुरेश पवार, राहुल बिडवे, अजित बोरकर, ॲड.प्रशांत रूपनवर, प्रा.अजित पारसे, दादा लोखंडे, प्रा. सतिश कुलाळ आदींनी विचार व्यक्त केले.
Reactions

Post a Comment

0 Comments