Hot Posts

6/recent/ticker-posts

पावसाचा तडाखा; ९० घरे जलमय, नागरिकांसह जनावरांचे हाल

 पावसाचा तडाखा; ९० घरे जलमय, नागरिकांसह जनावरांचे हाल

सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने सोलापूर शहरासह जिल्ह्यात हाहाकार माजवला आहे. रविवारी सकाळपर्यंत कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भाग जलमय झाले असून, प्रभाग क्रमांक ६ सर्वाधिक प्रभावित झाला आहे.बसवेश्वर नगर, संत रोहिदास नगर, पिंजर गल्ली, कोयनानगर, देगाव गावठाण, नाथ नगर आणि माऊली लँडमार्क परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून नागरिकांचे हाल झाले आहेत. या भागात जवळपास ८० ते ९० घरे बाधित झाली आहेत. घरामध्ये व परिसरात शिरलेल्या पाण्याचा निचरा करण्यात विलंब होत असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे.

परिस्थिती हाताळण्यासाठी प्रभागाचे नगरसेवक गणेश वानकर सकाळपासून ठाण मांडून कार्यरत होते व आहेत. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना कामाला लावून जलनिचरा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जेसीबीच्या सहाय्याने पाण्याला वाट करून देण्याचे काम वेगाने सुरू असून, मोटारी लावून पाणी उपसण्याची यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे.नगरसेवक वानकर यांनी बाधित भागाची पाहणी करून नागरिकांना धीर दिला. त्यांनी सांगितले की, बंदिस्तनाला योजनेअंतर्गत नालाबंदीस्तीचे काम अपूर्ण असल्यामुळे नागरिकांना सर्वाधिक फटका बसला आहे. गावठाण भागाकडेही महानगरपालिकेने तितक्याच गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

या भागात मोठ्या प्रमाणावर जनावरांची संख्या असून, त्यांनाही पावसामुळे हाल सहन करावे लागत आहेत. याची दखल घेत नगरसेवक वानकर यांनी नागरिकांच्या मदतीबरोबरच जनावरांसाठी चाऱ्याची सोय उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. प्रभागातील बंगल्यांमध्ये पाणी शिरले असून महागडी वाहने पाण्यात बुडाली आहेत. रस्त्यावरून पाणी ओसंडून वाहत असल्याने नागरिकांना पायी चालताही अडचणी येत आहेत. पावसाचा जोर असाच सुरू राहिल्यास हा भाग पुन्हा मोठ्या प्रमाणावर बाधित होऊ शकतो, अशी भीती नगरसेवक वानकर यांनी व्यक्त केली आहे.

पाहणीच्या वेळी नगरसेवक वानकर यांच्यासोबत अरुण जाधव, बाबासाहेब मल्लाडे, अमर कस्तुरे, संभाजी वाघ, राजू मोकाशी, योगेश भोसले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments