वेळांच्या गैरसोयीमुळे लांबली सोलापूर-पुणे-मुंबई विमानसेवा!
सोलापूर :- होटगी रोड विमानतळावरून गोव्याला विमानसेवा सुरू झाल्यानंतर आता सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरू होणार आहे. पण, मुंबई व पुणे विमानतळावर गैरसोयीचे स्लॉट (विमान उतरण्याची वेळ) मिळाल्याने विमानसेवा पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
मुंबई विमानतळावर मंगळवार, बुधवार, शुक्रवार व शनिवार या चार दिवशी दुपारी २ वाजता तर पुणे विमानतळावर पहाटे २ वाजता विमान उतरण्यास परवानगी मिळाली आहे. ही वेळ सोलापूरकरांसाठी गैरसोयीची आहे. आता मुंबई व पुणे या दोन्ही विमानतळावरील स्लॉट बदलून देण्याची मागणी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे करण्यात आली आहे.
सोलापूर-गोवा विमानसेवा सुरू झाल्यापासून मुंबईसाठी कधी विमानसेवा सुरू होणार याची चर्चा होती. स्टार कंपनीस सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली. पण मुंबई विमानतळावर आठवड्यातील चार दिवसांसाठी स्लॉट उपलब्ध झाला आहे. पण तो सोलापूरकरांसाठी गैरसोयीचा आहे. यामुळे विमानसेवा देणारी कंपनीकडून स्लॉट बदलून मिळण्याची मागणी केली आहे. राज्य शासनाने सात दिवस सेवा देण्यास परवानगी दिली आहे. पण, प्रत्यक्षात चार दिवसच स्लॉट मिळाला आहे.
दोन्ही शहरासाठी गैरसोयीच्या वेळा
सोलापूर येथून मुंबईसाठी मंगळवार, बुधवार, शुक्रवार व शनिवारी दुपारी १ वाजता तर मुंबईतून सोलापूरला दुपारी २ वाजता परवानगी मिळाली आहे. या दोन्ही वेळा सोलापूरहून मुंबईला व मुंबईहून सोलापूरला येणाऱ्या प्रवाशांसाठी गैरसोयीच्या आहेत. पुण्यासाठी सातही दिवसांसाठी पहाटे २ वाजताचा स्लॉट मिळाला आहे. परत सोलापूरसाठी दुपारी ३ वाजताचा स्लॉट मिळाला आहे. दोन्ही शहरात चुकीच्या वेळा मिळाला असल्याने प्रवाशांकडून किती प्रतिसाद मिळेल,असा सवाल सेवा देणाऱ्या कंपनीने उपस्थित केला आहे.
सात दिवसाची परवानगी...
मुंबईसाठी शासनाने ७ दिवसांची परवानगी दिली आहे. पण प्रत्यक्षात आम्हाला चार दिवसांची परवानगी मिळाली आहे. सोमवार व रविवार हे दोन दिवस आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्याच दिवशी स्लॉट नसल्याने सेवा देता येणार नाही. इतर दिवशीच्या वेळा दुपारच्या असल्याने प्रवाशांचा प्रतिसाद मिळेल का? याबद्दल शंका आहे. यामुळे शासनाकडे योग्य वेळेचे स्लॉट मिळण्याची मागणी केली आहे.
0 Comments