सोलापूर जिल्ह्यातील १०२४ गावांमध्ये 'समृद्ध पंचायतराज'ला सुरवात
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्ह्यातील १०२४ गावांमध्ये समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ शिरवळ (ता. अक्कलकोट) येथून करण्यात आला. यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती. हत्तूर (ता.दक्षिण सोलापूर) येथे आमदार सुभाष देशमुख, पंढरपूर तालुक्यातील तुंगत ग्रामपंचायतीत आमदार अभिजित पाटील यांच्या उपस्थितीत अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची जिल्हास्तरावरुन चित्ररथाने सुरुवात केलेली असून चित्ररथ हे सर्व तालुक्यात अभियानाची प्रचार-प्रसिद्धी करणार आहे. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ आदी पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून तालुक्यातील ग्रामपातळीवर सामाजिक न्याय, मनरेगा व उपजीविका विकास या क्षेत्रातील कामांना गती मिळेल. तसेच लोकसहभागातून योजनांचे अभिसरण सुलभ होईल. आपला सोलापूर जिल्हा राज्यात प्रथम येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी करमाळा तालुक्यातील सालसे व केम गावाला भेटी दिल्या. उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगोला तालुक्यातील चिणके गावाला भेटी दिल्या व अभियाना संदर्भात मार्गदर्शन केले. जिल्हा परिषदेकडील सर्व विभागप्रमुख यांनी विविध गावाला भेटी दिल्या.
जिल्हाभरात ग्रामसभा उत्साहात
तालुकास्तरावर प्रत्येक नोडल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत १०२४ ग्रामपंचायतींच्या ग्रामसभा उत्साहात घेण्यात आल्या. यासाठी सर्व गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, सरपंच, सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला. अभियानाची सुरुवात करण्यापूर्वी सदर ग्रामसभेची नोंद पंचायत निर्णय ॲपवर करून माहिती व फोटो अपलोड करण्यात आले.
अक्कलकोट तालुक्यातील शिरवळ गावाला उत्तम परंपरा आहे आणि समृद्ध पंचायतराज अभियानाचा मुहूर्तमेढ येथे रोवली जात आहे. संपूर्ण जिल्ह्यात ग्रामविकासाची लोकचळवळ निर्माण करणे, ग्रामपंचायतींना सक्षम व पारदर्शक बनविणे. तसेच हरित व सुशासनयुक्त पंचायत तयार करणे, यावर भर देण्याची आवश्यकता आहे.
0 Comments