सोलापूर (कटुसत्य वृत्त) – नैसर्गिक नाले अडवून करण्यात आलेली बेकायदा बांधकामे तातडीने हटवावीत, अन्यथा महापालिकेकडून थेट पाडकामाची कारवाई होईल आणि त्याचा खर्च संबंधित मिळकतधारकांकडून वसूल करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिला आहे.
गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरातील अनेक भागांत पाणी साचून नागरिकांचे मोठे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर महानगरपालिका व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या संयुक्त पथकाने बुधवारी बाधित भागांची पाहणी केली. यामध्ये अक्कलकोट रोडवरील पंजवनी मार्केट, सादूल पेट्रोल पंप, वज्रेश्वरी नगर, मुद्रा सन सिटी, विराट मॉल परिसर तसेच शेळगी नाला परिसर यांचा समावेश होता.
पाहणीत नॅशनल हायवेच्या कामांमुळे नैसर्गिक नाल्यांचा प्रवाह अडथळलेला असून पाणी निचऱ्यात अडचण निर्माण झाल्याचे दिसून आले. यामुळे स्थानिक व्यापारी व नागरिकांना फटका बसल्याचे स्पष्ट झाले.
या पाहणीत आ. विजयकुमार देशमुख, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, सहायक नगररचना संचालक मनीष भीष्णूरकर, नगर अभियंता सारिका आकुलवार, अभियंता नीलकंठ मठपती, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार चितारी तसेच नॅशनल हायवेचे अधिकारी स्वप्निल कासारे उपस्थित होते.
आयुक्त डॉ. ओम्बासे यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले की, ज्या ठिकाणी नैसर्गिक नाले अडवून अथवा वळवून अनधिकृत बांधकाम झाले आहे, त्या मिळकतधारकांना त्वरित नोटिसा देऊन २४ तासांची मुदत द्यावी . दिलेल्या मुदतीत कारवाई न झाल्यास महापालिका स्वतः पाडकाम करेल. तसेच पाणी निचऱ्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना भुयारी मार्ग करण्याचे नियोजन करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
नागरिकांना दिलासा मिळावा व पूरस्थिती टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यास महापालिका कटिबद्ध असून, कारवाई पुढील काही दिवसांत सुरू होईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
0 Comments